रक्षा खडसेंकडून मिझोरामच्या क्रीडा परिसंस्थेचा आढावा


रक्षा खडसेंकडून मिझोरामच्या क्रीडा परिसंस्थेचा आढावा
साई ऐझॉल केंद्राला भेट; क्रीडा मंत्री, खेळाडू व प्रशिक्षकांशी साधला संवाद
ऐझॉल, प्रतिनिधी: केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मंगळवारी ऐझॉल येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) केंद्राला भेट देत मिझोराममधील क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडूंचे प्रशिक्षण आणि क्रीडा विकासाचा आढावा घेतला. यावेळी मिझोरामचे क्रीडा व युवा सेवा मंत्री पु. लालंघिंगलोवा हमार यांनी रक्षा खडसे यांचे स्वागत केले.
दोन्ही मंत्र्यांनी मिझोराममधील क्रीडा विकासासाठी केंद्र व राज्य सरकारमधील समन्वय अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. यावेळी क्रीडा क्षेत्रातील विविध विषयांवरही विचारविनिमय करण्यात आला.
रक्षा खडसे यांनी साई केंद्रातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रशिक्षणाचा अनुभव, स्पर्धांमधील सहभाग तसेच भविष्यातील आकांक्षा जाणून घेतल्या. यावेळी साईचे सहाय्यक संचालक शिवम यादव उपस्थित होते.
ईशान्य भारतातील युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणासोबतच क्रीडा विज्ञान, पुनर्वसन, पोषण, स्पर्धांचा अनुभव तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर रक्षा खडसे यांनी भर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात क्रीडा संस्कृती अधिक व्यापक करण्यासाठी तसेच तळागाळातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मिझोरामसह संपूर्ण ईशान्य भारतातील क्रीडा प्रतिभेला या माध्यमातून अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर रक्षा खडसे यांनी यावेळी भर दिला.
मिझोराममधील क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने ऐझॉल येथील साई प्रशिक्षण केंद्रात ‘खेलो इंडिया’ अंतर्गत सिंथेटिक हॉकी टर्फ आणि प्रकाशयोजना उभारण्याचा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
लालरेम्सियामी हमारझोटे यांच्या कामगिरीचा उल्लेख
मिझोरामची क्रीडा प्रतिभा म्हणून लालरेम्सियामी हमारझोटे यांचे उदाहरण यावेळी अधोरेखित करण्यात आले. थेंझॉल येथील साई अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या लालरेम्सियामी या मिझोरामच्या पहिल्या महिला ऑलिम्पियन आणि पहिल्या आशियाई क्रीडा पदकविजेत्या ठरल्या आहेत. त्यांची अर्जुन पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे.
ईशान्य भारतात मोठी क्रीडा प्रतिभा आणि मजबूत क्रीडा संस्कृती आहे. क्रीडा सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि केंद्र व राज्य सरकारमधील समन्वय अधिक मजबूत करून या प्रतिभेला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले.






