महिलांनो सावधान.. बाजारात चोर फिरताय, गर्दीत अलंकार होताय गायब!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरासह जिल्ह्यात दिवाळीची धामधूम सुरू असून बाजारपेठ गर्दीने फुल्ल झाल्या आहेत. खरेदीसाठी महिलावर्गाची मोठी गर्दी झाली असून त्याच गर्दीत चोरटे देखील हात साफ करताय. फुले मार्केटमधून एकाच दिवसात ३ महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास झाल्याची घटना समोर आली आहे.
सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू झाली असून खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. जळगावात शहरात गोलाणी मार्केट, महात्मा फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट, फळ गल्ली, बळीराम पेठ, टॉवर चौक, घाणेकर चौक, सुभाष चौक, सराफ बाजार, राजकमल चौक परिसरात अनेकांनी दुकाने थाटली असल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे. विशेषतः महिला वर्ग मोठ्याप्रमाणात खरेदीसाठी येत आहेत.
तीन महिलांचे गळे साफ
मार्केट परिसरात चालण्यासाठी देखील जागा नसून तरीही महिलांची मोठी गर्दी होत आहे. गर्दीत हात साफ करणाऱ्या महिला आणि चोरटे देखील सक्रिय झाले आहेत. रविवारी फुले मार्केट परिसरातून तीन महिलांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र, सोन्याच्या वाटी चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांकडून आवाहन
सध्या बाजारपेठेत गर्दी असून नागरिकांनी विशेषतः महिलांनी खरे दागिने परिधान करू नये तसेच गर्दीत आपल्या आजूबाजूला लक्ष देत गर्दी किंवा धक्काबुक्की करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे. कुणीही संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.






