

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल
ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात
जळगाव : स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचा थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यावर वीजबिल न भरता परस्पर जोडणी घेणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत शुक्रवारी अशा ४ ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
महावितरणने प्रतापनगर येथील रहिवासी सतीश नारायण अमृतकर (ग्राहक दिलीप सुरजमल लाठी) या वापरकर्त्याचा वीजपुरवठा थकबाकीसाठी स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट (आपोआप खंडित) केलेला होता. मात्र त्यानंतरही त्याने थकबाकी भरली नाही. महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता या ग्राहकाने अनधिकृतपणे वीज जोडल्याचे आढळले. या ग्राहकाने २५३० रुपयांची वीजचोरी केली. दुसऱ्या प्रकरणात मेहरूण शिवारातील मोहंमद इरफान मोहंमद रफिक तांबोळी या ग्राहकाने थकबाकीसाठी स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा खंडित असतानाही अनधिकृतपणे वीज जोडून महावितरणचे १२ हजार ३७० रुपयांचे आर्थिक नुकसान केले. महावितरणचे सहायक अभियंता विवेक चौधरी यांच्या फिर्यादीवरून या ३ जणांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात २१ ऑगस्ट रोजी भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
तिसऱ्या प्रकरणात भादली बु. येथील प्लॉट एरियातील रहिवासी श्रीधर नारायण ठाकूर या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीमुळे स्मार्ट मीटरद्वारे आपोआप खंडित झालेला होता. मात्र त्याने थकबाकी न भरता बेकायदेशीर वीज वापरून महावितरणचे २२१० रुपयांचे नुकसान केले. महावितरणचे कनिष्ठ अभियंता विवेक जोशी यांच्या फिर्यादीवरून ठाकुरवर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात २१ ऑगस्ट रोजी भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी आपली वीजबिले तातडीने भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केला आहे. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची पडताळणी करण्यासाठी महावितरणने पथके स्थापन केली आहेत. वीजपुरवठा परस्पर जोडल्याचे या पथकांना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. तसेच अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडल्यास प्राणांतिक अपघाताचाही धोका आहे. त्यामुळे वीजपुरवठा अनधिकृतरीत्या जोडू नका. वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनीही अनधिकृतरीत्या वीजपुरवठा देऊ नये. नसता त्यांचाही वीजपुरवठा खंडित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणने कळवले आहे.







