Crime

महापुरुषांचे बॅनर फाडल्याप्रकरणी पहूर पोलिसांची कारवाई; एकाला अटक

महापुरुषांचे बॅनर फाडल्याप्रकरणी पहूर पोलिसांची कारवाई; एकाला अटक

दोन विधिसंघर्षग्रस्त बालक पालकांच्या ताब्यात

जामनेर | प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे महापुरुषांचे ३ बाय ३ आकाराचे बॅनर फाडल्याच्या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ बौद्ध व मातंग समाजातील सुमारे २५ ते ३० नागरिकांनी मुख्य रस्ता अडवून रास्ता रोको आंदोलन केले. मात्र, पहूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत कारवाईचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीण दातिरे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून बॅनर फाडल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन थांबवले.

या प्रकरणी तक्रारदार संजय लक्ष्मण लोखंडे (वय ४८, रा. मांडवे, ता. जामनेर) यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०३/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ व ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेत दर्शन नाना पवार (वय १९) तसेच दोन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिघांनी एकत्रितपणे सदर कृत्य केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार दोन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले, तर दर्शन नाना पवार याला अटक करण्यात आली आहे.

महापुरुषांचे बॅनर फाडल्याच्या घटनेनंतर तातडीने कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल पहूर पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button