कळंब गुन्ह्यातील मास्टरमाइंड इस्तियाक खातीब नागपुरातून जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चरस आणि MD जप्त

कळंब गुन्ह्यातील मास्टरमाइंड इस्तियाक खातीब नागपुरातून जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चरस आणि MD जप्त
यवतमाळ प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील अंमली पदार्थ प्रकरणातील फरार मुख्य सूत्रधार इस्तियाक खातीब याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने नागपुरातून अटक केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेला बळकटी देण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिता यांच्या नेतृत्वाखाली राबविल्या जाणाऱ्या कारवाईत ही मोठी कामगिरी नोंदवली गेली. या कारवाईत चरस (Hashish) आणि MD (Mephedrone) सारखे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, विदर्भातील ड्रग्जचे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
गुन्ह्याचा उलगडा दिनांक 28 मार्च 2025 रोजी कळंब येथील एका गुन्ह्यात नागपूर येथील अभय राजेंद्र गुप्ता (वय 30, रा. बुटीबोरी, नागपूर) याच्या ताब्यातून 26 ग्रॅम MD (Mephedrone) जप्त करण्यात आले होते. या अंमली पदार्थाची किंमत 1,40,000 रुपये इतकी होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार इस्तियाक खातीब हा तेव्हापासून फरार होता. त्याला पकडण्यासाठी आणि जिल्ह्यातील अंमली पदार्थांचे जाळे नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे आदेश दिले होते
.नागपुरात सापळा, अटक
30 मार्च 2025 रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, इस्तियाक हुसेन मुस्तफा हुसेन ऊर्फ इस्तियाक खातीब (वय 45, रा. बडा ताजबाग, ह. मु. निर्मल नगरी टाऊनशिप, नागपूर) हा नागपुरातील उच्चभ्रू निर्मल नगरी टाऊनशिपमध्ये लपून बसला आहे. पथकाने तातडीने सापळा रचला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या इस्तियाकला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 15.30 ग्रॅम MD (किंमत 76,500 रुपये), 8.75 ग्रॅम चरस (किंमत 43,750 रुपये) आणि अंमली पदार्थ विक्रीतून मिळालेली 2,38,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3,58,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला कळंब पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
कोण आहे इस्तियाक खातीब?
इस्तियाक हा ताजबाग दर्ग्यामध्ये सेवेकरी (खातीब) म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, तो विदर्भात अंमली पदार्थांचे जाळे पसरवण्यात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्या अटकेमुळे या गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली गेली. पथकात सपोनि संतोष मनवर, पोलीस अंमलदार योगेश गटलेवार, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, अजय डोळे, रितुराज मेडवे, आकाश सहारे आणि पोउपनि महेंद्र साळवे यांचा समावेश होता.