जळगावात ‘एक खिडकी’ योजनेला उदंड प्रतिसाद! ५८ गणेश मंडळांनी घेतली अधिकृत परवानगी


जळगावात ‘एक खिडकी’ योजनेला उदंड प्रतिसाद! ५८ गणेश मंडळांनी घेतली अधिकृत परवानगी
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अचानक भेट देऊन घेतला आढावा; पोलीस अन् महापालिकेचे कर्मचारी एकाच छताखाली कार्यरत
जळगाव प्रतिनिधी आगामी गणेशोत्सवाच्या धर्तीवर जळगाव शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना परवानग्यांसाठी दारोदारी भटकावे लागू नये, यासाठी पोलीस मुख्यालयाच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या ‘एक खिडकी योजने’ला गणेश मंडळांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या एक खिडकी उपक्रमातून आतापर्यंत शहरातील तब्बल ५८ सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या उत्सवाची अधिकृत परवानगी प्राप्त केली आहे. सोमवारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रत्यक्ष एक खिडकी केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि मंडळांना सर्व परवानग्या विनासायास एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी पोलीस प्रशासन व महापालिकेच्या वतीने पोलीस मुख्यालयात ही संयुक्त व्यवस्था उभी करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रावर गणेश मंडळांचे अर्ज, प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यासोबतच महापालिकेचे तयार अर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. परवानगी देताना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव, संपर्क क्रमांक व ओळखपत्राची पडताळणी केली जात असून, मंडप उभारणी व मिरवणुकीच्या रस्त्याचा नकाशाही बारकाईने तपासला जात आहे. पोलीस अधीक्षक धिवरे यांनी पाहणीदरम्यान सर्व कागदपत्रांची कायदेशीर तपासणी वेळेत पूर्ण करून गणेश मंडळांना तत्परतेने सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.







