
बजाज फायनान्सच्या कथित अरेरावीविरोधात शिवसेना–युवासेनेचे अमळनेर पोलिसांना निवेदन
कर्जवसुलीच्या नावाखाली धमकी, शिवीगाळ व मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारींची चौकशी करण्याची मागणी
अमळनेर | प्रतिनिधी बजाज फायनान्सच्या कर्जवसुली प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना कथित धमकी, शिवीगाळ, मानसिक त्रास, आरडाओरड तसेच अपमानास्पद भाषेचा वापर केल्याच्या तक्रारींची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
ग्राहकांकडून मानसिक त्रासाची तक्रार
शिरूड येथील विनोद पाटील आणि अमळनेर येथील वाल्मीक चौधरी यांनी कर्जवसुलीच्या संदर्भात बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्यांकडून मानसिक त्रास, धमकी तसेच आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याची तक्रार शिवसेना–युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली होती.
या तक्रारीबाबत अमळनेर येथील बजाज फायनान्सचे मॅनेजर दीपक चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली. यावेळी उद्धट व आक्षेपार्ह पद्धतीने उत्तर देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
कायदेशीर चौकटीत वसुलीची मागणी
कर्जाचा हप्ता थकीत असल्यास संबंधित वित्तीय संस्थेला कायद्याच्या चौकटीत राहून वसुली करण्याचा अधिकार आहे. मात्र, वसुलीच्या नावाखाली ग्राहकांना धमकावणे, शिवीगाळ करणे, अपमानित करणे किंवा मानसिक दबाव आणणे योग्य नसल्याचे शिवसेना–युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
कॉल रेकॉर्डिंग व पुरावे तपासण्याची मागणी
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवावेत. तसेच उपलब्ध फोन कॉल रेकॉर्डिंग, ऑडिओ-व्हिडिओ पुरावे आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी. चौकशीअंती कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास लागू कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
भविष्यात कर्जवसुलीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची धमकी, शिवीगाळ अथवा मानसिक त्रास दिला जाऊ नये, यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला आवश्यक त्या सूचना देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी ठामपणे पाठीशी”
«“ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना–युवासेना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील. ग्राहकांशी अरेरावी अथवा गैरवर्तन झाल्यास कायदेशीर व लोकशाही मार्गाने तीव्र निषेध नोंदविला जाईल.”»
निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब काशिनाथ पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज संतोष शेटे, युवासेना तालुकाप्रमुख राहुल भास्कर कंजर, उपतालुकाप्रमुख राहुल साहेबराव पाटील, उपतालुकाप्रमुख जयेश रवींद्र चव्हाण, युवासेना उपशहरप्रमुख राजा अल्ताफ राजा शेख, युवासेना पदाधिकारी ईश्वर जाधव, सचिन विलास पाटील आणि प्रदीप किरण देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
— शिवसेना व युवासेना, अमळनेर






