Other

टाकळी प्र. चा. ग्रामपंचायतीतील पाणीटंचाई व खराब रस्त्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय जनमंच पक्षाचे निवेदन

टाकळी प्र. चा. ग्रामपंचायतीतील पाणीटंचाई व खराब रस्त्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय जनमंच पक्षाचे निवेदन

गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

चाळीसगाव (प्रतिनिधी) : टाकळी प्र. चा. ग्रामपंचायतीअंतर्गत विविध प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई व खराब झालेल्या रस्त्यांच्या समस्येमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय जनमंच पक्षाने चाळीसगावचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत हद्दीतील अनेक भागांमध्ये नागरिकांना १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा होत असून त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची गरज वाढली असतानाही नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्यांचा आर्थिक भारही वाढला आहे.

याशिवाय ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक अंतर्गत व प्रमुख रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून नागरिक, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अपघाताचा धोका वाढल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय जनमंच पक्षाने प्रशासनाकडे नियमित व नियोजनबद्ध पाणीपुरवठा सुरू करणे, पाणीपुरवठा योजनेची तांत्रिक तपासणी करून अडचणी दूर करणे, खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे, पावसाळ्यापूर्वी विशेष रस्ता दुरुस्ती मोहीम राबविणे तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.

मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रीय जनमंच पक्ष व ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर राष्ट्रीय जनमंच पक्षाचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष सुरेश वेलीस, महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास वाघ, महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे, जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास हटकर, जळगाव शहराध्यक्ष प्रमोद डोंगरे, चाळीसगाव तालुका बांधकाम कामगार आघाडी प्रमुख अमोल पाटील, चाळीसगाव शहर युवक आघाडी अध्यक्ष अधिकार पाटोळे, साहेबराव सपकाळे, आबा सोनार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button