शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा
कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची व न्यूरोसर्जन नियुक्तीची मागणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा
कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची व न्यूरोसर्जन नियुक्तीची मागणी
जळगाव : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छता व दैनंदिन कामकाजाच्या ठेक्याबाबत गंभीर तक्रारी समोर येत असून स्मार्ट कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, कामावरून कमी करण्यात आलेल्या साई मल्टी सर्व्हिसेसच्या ६० ते ८० कामगारांना तातडीने पुन्हा रुजू करून घ्यावे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरोसर्जनची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छता आणि इतर आवश्यक कामांसाठी स्मार्ट कंपनीला शासनाकडून मक्ता देण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून संबंधित कंपनीकडून रुग्णालयाची वेळेवर साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच साई मल्टी सर्व्हिसेसच्या माध्यमातून काम करणाऱ्या सुमारे ६० ते ८० कामगारांचे काम अचानक बंद करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कामगारांना कमी केल्यामुळे रुग्णालयातील स्वच्छता व इतर महत्त्वाची कामे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली असून त्याचा परिणाम रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्यावर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच काही सुशिक्षित युवकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आर्थिक वसुली झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
कोरोना काळापासून सेवा बजावणाऱ्या कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. कमी करण्यात आलेल्या सर्व कामगारांना तातडीने कामावर घेण्यात यावे, अन्यथा कामगार आपल्या कुटुंबीयांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डीन कार्यालयासमोर उपोषणाला बसतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात तीन मंत्रीपदे असूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्याप न्यूरोसर्जनची नियुक्ती नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तातडीने न्यूरोसर्जनची नियुक्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक राजूभाऊ मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत आणि माजी नगरसेवक सुनील माळी यांनी दिला आहे.






