Crime

अपघातग्रस्त कारमधून गुटखा तस्करीचा पर्दाफाश!

अपघातग्रस्त कारमधून गुटखा तस्करीचा पर्दाफाश!

निंभोरा पोलिसांची कारवाई; दोन आरोपी अटकेत, कारसह ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध निंभोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अपघातग्रस्त कारमधून प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, कारसह एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ५.४५ वाजता रावेर तालुक्यातील वडगाव फाट्याजवळ एका चारचाकी वाहनाने सोनालिका कंपनीच्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

अपघातग्रस्त वाहन सिल्वर-गोल्ड रंगाची हुंडाई कंपनीची आय-१० कार (क्रमांक एमएच-२६-व्ही-४४२३) असल्याचे निदर्शनास आले. कारची पाहणी करताना त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला असल्याचा संशय आला. अपघातामुळे घटनास्थळी नागरिकांची गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कार, चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला निंभोरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

त्यानंतर पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता त्यामध्ये विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५), तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अजीम तैय्यब सय्यद (वय २३, रा. धरतीधन सोसायटी, इंदिरानगर, क्रांती चौक, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) आणि शेख मुद्दस्सिर कासिम (वय २३, रा. इंदिरानगर, आलमगीर मशीदजवळ, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विविध प्रकारच्या गुटखा व पानमसाल्याची किंमत ५ लाख ९० हजार ४४० रुपये, तर हुंडाई आय-१० कारची किंमत १ लाख ८० हजार रुपये असल्याचे नमूद केले आहे. अशा प्रकारे एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला कुठून आणण्यात आला, तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास निंभोरा पोलिसांकडून सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे तसेच पोलीस कर्मचारी सतीश सानप, किरण जाधव, महेंद्र महाजन, परेश सोनवणे, प्रशांत चौधरी, अमोल वाघ आणि सफराज तडवी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button