समृद्धी की पाठशाला कार्यशाळेतून पाणी बचतीचा संदेश


समृद्धी की पाठशाला कार्यशाळेतून पाणी बचतीचा संदेश
वाघूर कालवा परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; तज्ज्ञांकडून आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
जळगाव, (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या जलसंधारण मंत्रालय आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने नशिराबाद येथे ‘समृद्धी की पाठशाला’ या उपक्रमांतर्गत वाघूर डावा कालवा असोदा-भादली शिवार परिसरातील शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. एमसीएडी समृद्धी योजनेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी अशोक जेएफ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता उत्तम दाभाडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ बी. डी. जडे तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेत उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम व नियोजनबद्ध वापर करून शेती उत्पादन वाढविण्याचे उपाय, पाणी बचत आणि जलव्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याचा प्रत्येक थेंब शेतीच्या विकासासाठी महत्त्वाचा असून आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत शक्य असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
केंद्रीय जलसंधारण विभागाचे प्रकल्प संचालक अशोक जेएफ यांनी पाणी व्यवस्थापन, शेतीसाठी पाणी नियोजन तसेच प्रेशरयुक्त पाईप सिंचन प्रणालीचे फायदे यावर मार्गदर्शन केले. पारंपरिक सिंचन पद्धतींमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रेशरयुक्त पाईप इरिगेशन प्रणालीमुळे पाण्याची वाहतूक अधिक कार्यक्षम होत असून बाष्पीभवन व गळतीमुळे होणारे नुकसान कमी होते. परिणामी पिकांना आवश्यक तेवढे पाणी योग्य वेळी उपलब्ध होऊन उत्पादनवाढीस मदत होते, असे त्यांनी सांगितले.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन आणि पाणी बचतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. समृद्धी योजनेमुळे पाण्याचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक होणार असून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी सूक्ष्म सिंचनासह प्रेशरयुक्त पाईप सिंचन प्रणाली प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. त्याच उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे,” असे प्रतिपादन अशोक जेएफ यांनी केले.
यावेळी समाजमाध्यम तज्ज्ञ अंकित पांडे, शास्त्रज्ञ बी. डी. जडे आणि पंडित शिंदे यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सहाय्यक अभियंता किशोर देशमुख यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट केली.
कार्यक्रमादरम्यान पाणी वापर, पाणी बचतीचे महत्त्व आणि प्रेशर पाईप इरिगेशन सिस्टीमविषयी माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अपूर्वा वाणी यांनी केले. कार्यक्रमास वाघूर प्रकल्प, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कर्मचारी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.







