Other

चार वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी; विविध कामांच्या चौकशीचीही मागणी

चार वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी; विविध कामांच्या चौकशीचीही मागणी

नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांची तातडीने बदली करण्यात यावी तसेच त्यांच्या कार्यकाळातील विविध कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप साळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रदीप साळी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, रवींद्र सोनवणे हे मार्च २०२२ पासून नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ चार वर्षांच्या जवळ पोहोचला असून, सामान्यतः अशा पदावरील अधिकाऱ्यांचा कार्यकाळ सुमारे तीन वर्षांचा असतो. मात्र, मुदत पूर्ण होऊनही त्यांची बदली न झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

निवेदनात मुख्याधिकारी नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप करण्यात आला असून, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. तसेच स्वच्छता कंत्राटांबाबत गंभीर आरोप करत दरवर्षी एकाच व्यक्तीला कंत्राट दिले जात असल्याने या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सफाई कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिले जात नसल्याने त्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, ५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. निविदेतील अटींनुसार ही योजना १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्याप काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, नशिराबाद शहरातील नागरिकांना आठ ते दहा दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत असल्याचा दावा प्रदीप साळी यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांची बदली रोखण्यासाठी नगरपरिषदेतील काही लोकप्रतिनिधींनी मुंबई गाठल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या चर्चेला कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

मुदत संपूनही एकाच अधिकाऱ्याला कायम ठेवण्यामागचे कारण काय, प्रशासनात इतर सक्षम अधिकारी नाहीत का आणि बदली प्रक्रिया नेमकी कोणत्या कारणामुळे रखडली आहे, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी तसेच मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी प्रदीप साळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

(टीप : निवेदनातील आरोप हे तक्रारदाराने केलेले असून संबंधित अधिकाऱ्यांची बाजू समोर आलेली नाही.)

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button