जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; एकाच दिवशी २,३७० हून अधिक कारवाया
दारूबंदी, जुगार, अमली पदार्थ, वाहतूक नियमभंगाविरोधात धडक मोहीम; ३४ बेपत्ता महिलांचा शोध

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; एकाच दिवशी २,३७० हून अधिक कारवाया
दारूबंदी, जुगार, अमली पदार्थ, वाहतूक नियमभंगाविरोधात धडक मोहीम; ३४ बेपत्ता महिलांचा शोध
जळगाव, (प्रतिनिधी) : कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलाने ५ जून रोजी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबवून विविध प्रकारच्या गुन्हेगारी व बेकायदेशीर कृत्यांविरोधात व्यापक कारवाई केली. या मोहिमेत दारूबंदी, जुगार, अमली पदार्थ, वाहतूक नियमभंग, अवैध वाळू वाहतूक आणि फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके कार्यरत होती.
दारूबंदी व जुगार प्रकरणांवर मोठी कारवाई
मोहिमेदरम्यान दारूबंदी कायद्यांतर्गत तब्बल १९६ गुन्हे नोंदविण्यात आले असून सुमारे २१.६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध ५६ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच जुगाराच्या ७६ प्रकरणांमध्ये ४६ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमली पदार्थ व शस्त्र बाळगणाऱ्यांवरही कारवाई
शस्त्र अधिनियमांतर्गत ४ गुन्हे नोंदविण्यात आले, तर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये १० गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय कोटपा कायद्यांतर्गत २०३ कारवाया करण्यात आल्या.
३४ बेपत्ता महिलांचा शोध
या विशेष मोहिमेचे एक महत्त्वपूर्ण यश म्हणजे ३४ बेपत्ता महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. तसेच विविध प्रलंबित प्रकरणांतील ४२ अटक वॉरंट आणि ५२ जामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
वाहतूक शाखेने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध १,४४३ कारवाया करून ९ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या ३७ वाहनचालकांविरुद्धही गुन्हे नोंदविण्यात आले.
अवैध वाळू वाहतूक आणि फरार आरोपी जेरबंद
अवैध वाळू वाहतुकीच्या ६ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली, तर दोन फरार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. याशिवाय जिल्हाभरातील २०८ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
कायदा सुव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न
‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत करण्यात आलेल्या या व्यापक कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे. जिल्ह्यात अशा विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.






