शेतकऱ्यांच्या हक्कांशी तडजोड नाही’; जळगाव विमानतळ विस्तारीकरणाचा पालकमंत्र्यांकडून आढावा

शेतकऱ्यांच्या हक्कांशी तडजोड नाही’; जळगाव विमानतळ विस्तारीकरणाचा पालकमंत्र्यांकडून आढावा
प्रकल्पग्रस्तांना न्याय, शेतरस्ते आणि प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश; सौर पथदिव्यांसाठी ५ कोटी मंजूर
जळगाव: “जळगाव विमानतळाचा विकास आणि विस्तारीकरण ही जिल्ह्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, विकास करताना ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. विकासही झाला पाहिजे आणि शेतकरी बांधवांच्या हक्कांचेही संरक्षण झाले पाहिजे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, शेतरस्ते आणि ये-जा करण्याचे मार्ग प्रशासनाने तातडीने मार्गी लावावेत,” असे ठाम निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जळगाव विमानतळ विकास, विस्तारीकरण आणि परिसरातील विविध विकासकामांचा आढावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत नशिराबाद, चिंचोली, उमाळा, कुसुंबा परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली.
जमीन मोजणी तातडीने पूर्ण करा
विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक जमीन मोजणीत शेतकऱ्यांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही अनावश्यक विलंबाविना मोजणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार मिळणारी मदत व लाभ वेळेत उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
शेतात जाण्यासाठी १० फुटांचा स्वतंत्र मार्ग
विमानतळाच्या संरक्षण भिंतीमुळे शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून भिंतीलगत १० फूट रुंदीचा स्वतंत्र प्रवेशमार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी विमानतळ प्राधिकरणाला दिले. यावर प्राधिकरणाने सकारात्मकता दर्शवली. तसेच अजिंठा चौफुली ते विमानतळ रस्त्यावर सौर पथदिव्यांसाठी DPDC मधून ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
₹६.६० कोटींच्या रस्त्याच्या कामाला गती
चिंचोली–नशिराबाद–उमाळा कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण व पुलाच्या कामासाठी ₹६.६० कोटींचा निधी मंजूर झाला असून काम वेगाने सुरू आहे. हे काम दर्जेदार पद्धतीने तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. या कामाबद्दल नशिराबाद नगर परिषदेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला.
मालमत्ता कराबाबत १५ दिवसांत बैठक
नशिराबाद नगर परिषदेच्या विमानतळ प्राधिकरणाकडे असलेल्या ₹१२.५० कोटींच्या थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी १५ दिवसांनंतर स्वतंत्र संयुक्त बैठक घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
या बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे (ऑनलाइन), आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, नगराध्यक्ष योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, AAI अधिकारी हर्ष त्रिपाठी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







