विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासत व्यासंग वाढवावा : डॉ. प्रसाद चौधरी

विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासत व्यासंग वाढवावा : डॉ. प्रसाद चौधरी
शासकीय तंत्रनिकेतन जळगावमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; पुस्तक वाचनासह वैचारिक चर्चेवर भर
जळगाव : भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाइल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथे ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमासोबतच अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. संस्थेचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रसाद चौधरी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संदर्भग्रंथ, चरित्रे, आत्मचरित्रे, वैचारिक साहित्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयांवरील पुस्तके आवर्जून वाचावीत. कोणत्याही संस्थेचे ग्रंथालय ही त्या संस्थेची ज्ञानसंपदा असते. विद्यार्थ्यांनी मोबाईलसोबतच हातात पुस्तकही ठेवावे. वाचनामुळे व्यक्ती प्रगल्भ होते, तिच्यात सामाजिक जाणीवा निर्माण होतात आणि संवेदनशील व सजग नागरिक घडण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे कार्य आणि विचार वाचनातून समजून घेत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी वाचनाची सवय दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे आवाहन केले.
*वाचनानंतर वैचारिक चर्चेचे आयोजन*
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वाचन प्रेरणा दिन केवळ औपचारिक कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता प्राचार्य डॉ. प्रसाद चौधरी यांनी केलेल्या वाचनावर आधारित साधक-बाधक चर्चा घडवून आणण्यात आली. ज्ञान आणि विचारांची देवाणघेवाण घडवून आणणारी ही चर्चा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली.
येत्या काळात विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाकडे आपली पावले वळवून पुस्तकांशी मैत्री करावी, असे मत स्थापत्य विभागप्रमुख डॉ. पराग पाटील यांनी व्यक्त केले. तर ग्रंथालयीन अधिकारी प्रा. सी. पी. भोळे यांनी ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा ज्ञानवृद्धीसाठी उपयोग करण्याचे आवाहन केले.
यावेळी कार्यालयीन प्रमुख श्री. जाधव यांच्यासह ग्रंथालयातील अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचनाची गोडी निर्माण करणे, ज्ञानाचा विस्तार करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक प्रगल्भता वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.







