धुळ्यातील जबरीचोरी-घरफोडी करणारी टोळी निष्पन्न; एकास अटक
धुळे व अमळनेरमधील चार गुन्ह्यांची उकल, चार साथीदारांचा शोध सुरू

धुळ्यातील जबरीचोरी-घरफोडी करणारी टोळी निष्पन्न; एकास अटक
धुळे व अमळनेरमधील चार गुन्ह्यांची उकल, चार साथीदारांचा शोध सुरू
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
धुळे : शहरातील जबरीचोरी आणि घरफोडीच्या घटनांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांची टोळी निष्पन्न केली आहे. टोळीप्रमुख गुरुचरणसिंग रणजितसिंग शिकलकर याला सुरत येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून, त्याच्या चौकशीत धुळे शहरासह अमळनेर येथील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. टोळीतील अन्य चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
मास्कधारी चोरट्यांकडून घरात जबरीचोरी
८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ ते ५.५५ वाजेच्या सुमारास धुळे शहरातील साक्री रोडवरील अजबेनगर परिसरात दोन घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले होते. मनोज मोहनलाल शर्मा यांच्या घरात मास्क लावलेल्या अनोळखी इसमांनी जबरीचोरी केली. त्यानंतर संतोष कुंदनमल जैन यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून सुमारे २६ हजार ४०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरीला नेण्यात आले होते. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीवरून टोळीप्रमुख जाळ्यात
या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना १३ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुचरणसिंग रणजितसिंग शिकलकर (रा. यशवंतनगर, साक्री रोड, धुळे) याला सुरत येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
धुळे ते अमळनेरपर्यंत गुन्ह्यांची मालिका
पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुचरणसिंगने राजेंद्रसिंग ऊर्फ राजसिंग शिकलकर, अमृतसिंग ऊर्फ अण्णा बबलुसिंग टाक शिकलकर, सुनिलसिंघ घुंगरुसिंघ तिलपितीया आणि बॉवीसिंघ घुंगरुसिंघ तिलपितीया यांच्या साथीने ८ ऑगस्ट रोजी धुळे शहरातील अजबेनगरमधील दोन घरे, नकाणे रोडवरील शिक्षक कॉलनी तसेच अमळनेर येथे चोरी केल्याची माहिती चौकशीत समोर आली.
या कारवाईत धुळे शहरातील जबरीचोरी व घरफोडी तसेच अमळनेर येथील चोरीचे मिळून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये धुळे शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ३४४/२०२६, पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २२८/२०२६ तसेच अमळनेर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४१३/२०२६ आणि ४१४/२०२६ यांचा समावेश आहे.
आरोपीवर यापूर्वीही गुन्हे
अटक करण्यात आलेल्या गुरुचरणसिंग शिकलकर याच्याविरुद्ध यापूर्वी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७०७/२०२५ आणि ७०८/२०२५ असे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणातील राजेंद्रसिंग ऊर्फ राजसिंग शिकलकर, अमृतसिंग ऊर्फ अण्णा बबलुसिंग टाक शिकलकर, सुनिलसिंघ घुंगरुसिंघ तिलपितीया आणि बॉवीसिंघ घुंगरुसिंघ तिलपितीया हे चार आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक काम करीत आहे.
पोलिस पथकाची कामगिरी
पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोउनि. अमरजित मोरे, पोउनि. अमित माळी तसेच पोलीस अंमलदार योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, दिनेश परदेशी, तुषार सूर्यवंशी, सतीश जाधव, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, महेंद्र सपकाळ, अमोल पाटील, सुनील पाटील व अमोल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.







