FarmingSocial

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
जळगाव अल निनोच्या प्रभावामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांमध्ये चारा साक्षरता व चारा संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, जळगाव यांच्या वतीने ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पशुवैद्यकीय चिकित्सालय, पहूर, ता. जामनेर येथून करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रदीप झोड, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जळगाव उपस्थित होते. त्यांनी अभियानाची सविस्तर माहिती देताना उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन आणि कार्यक्षम वापर करण्याची गरज व्यक्त केली.

चारा टंचाई निर्माण होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक व पूर्वतयारीच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगून डॉ. झोड यांनी पिकांच्या अवशेषांचे जतन, सुरक्षित चारा साठवणूक, मूरघास निर्मिती, अझोला उत्पादन, हायड्रोफोनिक चारा तसेच स्थानिक पातळीवर चारा उत्पादन वाढविणे याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. स्वप्नजा लोखंडे यांनी चारा युरिया प्रक्रियेबाबत, तर डॉ. रामदास जाधव, जळगाव यांनी कडबा कुट्टी व चारा बियाणे याबाबत मार्गदर्शन केले. अभियानाच्या निमित्ताने परिसरातील मागणी केलेल्या ५१ पशुपालकांना चारा उत्पादनासाठी बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पहूर पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रमुख डॉ. श्रीकांत व्यवहारे यांनी केले. चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करावा. तसेच भविष्यातील चाऱ्याची गरज लक्षात घेऊन चारा पिकांची लागवड व नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभलेले जामनेर तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री. श्रीकृष्ण इंगळे यांनी दुष्काळी परिस्थितीत जनावरांना वर्षभर पुरेसा व सकस चारा उपलब्ध होण्यासाठी पशुपालकांमध्ये चारा नियोजनाबाबत सातत्याने जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पशुपालकांनी वैरण विकास योजनेंतर्गत चारा पिकांच्या लागवडीसाठी बियाणे मिळविण्याकरिता नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आपली मागणी नोंदवावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमास डॉ. शामकांत हिरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जळगाव, बाबुराव घोंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रदीपभाऊ लोढा, माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती, शंकर जाधव, राजू जाधव, उपसरपंच, पहूर कसबे, ॲड. संजय पाटील, रमेश नागपुरे, शिवदास गव्हाळे, तसेच ग्रामविकास अधिकारी, पहूर कसबे व पहूर पेठ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, नाचणखेडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. एकनाथ बारी, सुनील बारी, मिलिंद बारी, दादाराव पाटील, अशोक जाधव, संजय पाटील व नरेंद्र गोसावी यांचे सहकार्य लाभले. योगेश पाटील यांनी आभार मानले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button