मैत्रेय ग्रुपच्या एजंटांनी गुंतवणूकदारांची कागदपत्रे घेऊन १० ऑक्टोबरला हजर राहावे
आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन; गुंतवणूकदारांच्या माहितीसह दस्तऐवजी पुरावे सादर करण्याचे निर्देश


मैत्रेय ग्रुपच्या एजंटांनी गुंतवणूकदारांची कागदपत्रे घेऊन १० ऑक्टोबरला हजर राहावे
आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन; गुंतवणूकदारांच्या माहितीसह दस्तऐवजी पुरावे सादर करण्याचे निर्देश
जळगाव, प्रतिनिधी : मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या पुढील तपासाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील मैत्रेय ग्रुपशी संबंधित कंपनीचे सर्व प्रतिनिधी (एजंट) यांनी गुंतवणूकदारांची माहिती व उपलब्ध दस्तऐवजी पुरावे घेऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६५/२०१६ नुसार भारतीय दंड विधान कलम ४२०, ४०६, ३४, तसेच ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमातील कलम ३, ४, ५ आणि प्राईज चिट्स अँड मनी सर्क्युलेशन स्कीम्स (बॅनिंग) कायदा १९७८ मधील कलम ३, ४, ५, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याकडून करण्यात आला असून, दोषारोपपत्र जळगाव न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीसी कलम १७३(८) अन्वये सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील मैत्रेय ग्रुपशी संबंधित सर्व कंपनी प्रतिनिधी (एजंट) यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली गुंतवणूकदारांची माहिती आणि संबंधित दस्तऐवजी पुरावे घेऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित राहावे.
एजंटांनी १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित राहून तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी प्रसिद्धीसाठी माहिती दिली आहे.







