मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट


मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट
एआय, तंत्रज्ञान व बदलत्या कायद्यांनुसार सीएंनी ज्ञान अद्ययावत ठेवण्याचे आवाहन; रँकर्स विद्यार्थ्यांचा सत्कार
जळगाव, प्रतिनिधी : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मुंबई WIRC विभागाच्या कार्यकारी मंडळाने शुक्रवार (दि. २ ऑक्टोबर) जळगाव सीए शाखेला भेट दिली. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात दिवसभर विविध उपक्रम, संवाद, मार्गदर्शनपर सत्रे, विद्यार्थ्यांचा सत्कार, चर्चात्मक बैठक तसेच सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
मुंबई WIRC विभागाचे अध्यक्ष सीए सौरभ अजमेरा, सेक्रेटरी सीए बिशान शाह, कोषाध्यक्ष सीए राकेश शाह, मुंबई सीए विद्यार्थी शाखेचे चेअरमन सीए राजेश अग्रवाल, जळगाव सीए शाखेचे नॉमिनी आरसीएम सीए जितेंद्र सगलानी आणि आरसीएम सीए विजेंद्र जैन यांच्यासह मान्यवरांचे जळगाव सीए शाखेत आगमन झाले.
यावेळी जळगाव सीए शाखेचे अध्यक्ष सीए रोशन रुणवाल, उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखा अध्यक्ष सीए सोहन नेहेते, सेक्रेटरी सीए करण काबरा, कार्यकारी मंडळ सदस्य सीए लक्ष्मीकांत लाहोटी, सीए नचिकेत जाखेटीया, तत्काळ माजी अध्यक्ष सीए हितेश आगीवाल, संयुक्त सदस्य सीए तृप्ती राठी आणि सीए हितेश जैन यांच्यासह शाखेचे सर्व माजी अध्यक्ष व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाखेच्या व्यवस्थापन समितीतर्फे मुंबई WIRC टीममधील मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. अध्यक्ष सीए रोशन रुणवाल यांनी प्रास्ताविकात मान्यवरांची ओळख करून देताना जळगाव सीए शाखेसाठी हा दिवस अभिमानाचा व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सदस्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाखा सातत्याने प्रयत्नशील असून WIRCच्या मार्गदर्शनातून जळगाव शाखेला पुढील काळात अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रँकर्स विद्यार्थ्यांचा सत्कार
सीए फायनल, सीए इंटरमिजिएट आणि सीए फाउंडेशन परीक्षेत यश मिळवून रँक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मुंबई WIRC टीमच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना त्यांच्या यशामागे आई-वडील, कुटुंबीय आणि मार्गदर्शकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा आणि क्षमतेचा उपयोग समाज तसेच व्यावसायिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी करावा, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या.
ICAI आर्थिक पारदर्शकतेचा कणा
जळगाव सीए शाखेचे नॉमिनी आरसीएम सीए जितेंद्र सगलानी यांनी गेल्या काही वर्षांत शाखेने प्रगतीचा उत्कृष्ट मार्ग दाखविला असल्याचे सांगितले. ICAI ही केवळ लेखापरीक्षणाची व्यावसायिक संस्था नसून देशाच्या आर्थिक पारदर्शकतेचा कणा असल्याचे त्यांनी नमूद केले. तरुण सीए आणि विद्यार्थ्यांनी शाखेच्या माध्यमातून अधिक सक्रिय व्हावे, WIRCच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि सातत्याने ज्ञानवृद्धी करत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
आरसीएम सीए विजेंद्र जैन यांनी जळगाव शाखेने व्यावसायिक उपक्रम, सेमिनार, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आणि सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत सातत्याने काम केले असल्याचे सांगितले. WIRCच्या माध्यमातून पश्चिम भारतातील शाखांना अधिक बळकटी देण्यासाठी तसेच प्रत्येक सदस्यापर्यंत ज्ञान, नेटवर्किंग आणि संसाधने पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीए राजेश अग्रवाल, सीए राकेश शाह आणि सीए बिशान शाह यांनी नव्याने पात्र झालेल्या सीएंचे अभिनंदन केले. बदलत्या काळानुसार सीएंनी स्वतःला अद्ययावत ठेवावे आणि नव्या संधींचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. जळगाव सीए शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.
एआय, तंत्रज्ञानाच्या बदलांशी जुळवून घेणे गरजेचे
मुंबई WIRC विभागाचे अध्यक्ष सीए सौरभ अजमेरा यांनी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांमधील सीए सदस्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी, व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी आणि कौशल्यविकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. जळगाव शाखेकडूनही सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आजच्या बदलत्या युगात तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नवीन कायद्यांमुळे व्यावसायिक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. या बदलांना सामोरे जाण्यासाठी सीएंनी आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज असल्याचे अजमेरा यांनी सांगितले.
एआय कोर्स, वित्तीय साक्षरतेवर भर
यावेळी मुंबई WIRC समिती सदस्यांची जळगाव सीए शाखेच्या माजी अध्यक्षांसोबत चर्चात्मक बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेत सीए सौरभ अजमेरा यांनी ICAIतर्फे सभासद आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
सभासद आणि विद्यार्थ्यांसाठी एआय कोर्स, तसेच वित्तीय साक्षरता अभियानांतर्गत जीएसटी, इन्कम टॅक्स आणि सायबर फ्रॉडबाबत मार्गदर्शन करण्यात येते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सीए विद्यार्थ्यांना ICAIतर्फे शिष्यवृत्तीही दिली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई येथे ४ व ५ डिसेंबर २०२६ रोजी सीए सभासदांसाठी प्रादेशिक परिषद, तर ५ व ६ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय सीए विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक सीए सभासद आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी करून या परिषदांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीए सौरभ अजमेरा यांनी केले.
गौसेवा व वृक्षारोपण
मुंबई WIRC टीमतर्फे पांजरापोळ गौशाळेत ‘सामूहिक गौसेवा एक अनुष्ठान’ हा उपक्रम राबविण्यात आला. गौसेवाव्रती अॅड. विजय काबरा यांच्या सोबत टीमच्या सदस्यांनी गौसेवा केली. यावेळी वृक्षारोपणाचाही उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए अम्रिता मणियार आणि सीए मानसी कुळकर्णी यांनी केले. आभार सीए करण काबरा यांनी मानले.







