
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । स्वच्छ भारत अभियानाचे नारे देणाऱ्या जळगाव शहर महानगरपालिकेचा खरा ‘कचरा’ आता चव्हाट्यावर आला आहे. शहरातील शनिपेठ, बळीराम पेठ, घाणेकर चौक, सुभाष चौक आणि फळ गल्ली यांसारख्या अत्यंत गजबजलेल्या भागात भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी रस्त्यालाच ‘कचराकुंडी’ बनवले आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे मनपा आयुक्त, आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधींनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने जळगावकर आता संताप व्यक्त करत आहेत.
विक्रेत्यांची मुजोरी, प्रशासनाचे अभय?
शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात दररोज शेकडो भाजीपाला आणि फळ विक्रेते व्यवसाय करतात. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर उरलेला सडका भाजीपाला, खराब फळे आणि कचरा विक्रेते थेट रस्त्यावरच फेकून निघून जातात. विशेषतः घाणेकर चौक, चौबे शाळा आणि दायमा शाळा परिसरातील मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. महापालिका या विक्रेत्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई का करत नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
विद्युत डीपीजवळ कचऱ्याचे साम्राज्य; जीवितहानीची शक्यता
सर्वात भयानक बाब म्हणजे, हा कचरा चक्क मुख्य विद्युत डीपी (रोहित्र) जवळ टाकला जात आहे. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे अनेकदा वीज वाहिन्या जळून खाक झाल्या आहेत. यामुळे तासनतास वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना उन्हाच्या उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. कचऱ्यामुळे लागलेली ही आग कधीतरी मोठ्या दुर्घटनेला किंवा जीवितहानीला निमंत्रण देईल, तेव्हाच प्रशासन जागे होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागरिकांचे जगणे झाले मुश्किल
मुख्य रस्त्यांवर कचराकुंडी तयार झाल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. कचऱ्याची दुर्गंधी, मोकाट जनावरांचा वावर यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. एकीकडे कचरा संकलनाचा मक्ता दिलेला असताना, कचऱ्याचे हे ढीग का उचलले जात नाहीत? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
सत्ताधारी आणि प्रशासन उत्तर देणार का?
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्य आणि स्थानिक नगरसेवक याकडे कधी लक्ष वेधणार? जवळच ३ माजी नगरसेवकांचे निवासस्थान असून त्यांनी देखील याबाबत तक्रार केली आहे. मक्तेदाराकडून काम करून घेण्याची हिंमत मनपा प्रशासनात का नाही? आरोग्य विभागाला रस्त्यावरचा हा नरक दिसत नाही का? असे जळगावची जनता आता विचारत आहे. महापालिका प्रशासन या कचऱ्याच्या विळख्यातून जळगावकरांची सुटका कधी करणार की आणखी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार? हे आता पाहावे लागणार आहे.






