Politics

जळगाव विधान परिषद निवडणूक : १२ उमेदवारांची माघार; चौरंगी लढत निश्चित!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. माघारीच्या अंतिम दिवशी तब्बल १२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात चार उमेदवार उरले आहेत.

माघार घेणाऱ्या उमेदवारांमध्ये आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद (रावेर), हितेंद्र रमेश देशमुख (चोपडा), निलेश सुरेश चौधरी (धरणगाव), सुनील निमिदास जंगले (सावदा), शेख दानिश शेख निसार (फैजपूर), करीम खान हैदर खान मणियार (फैजपूर), दीपक काशिनाथ धांडे (भुसावळ), निलेश गणेश झोपे (वरणगाव), प्रवीण गंगाराम पाटील (अमळनेर), धूपनेश्वर रामकृष्ण पाटील (चाळीसगाव), सचिन संतोष चौधरी (भुसावळ) आणि जावेद इकबाल अब्दुल रशीद (जामनेर) यांचा समावेश आहे.

माघारीनंतर आता भाजपचे नंदकिशोर महाजन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शरद तायडे, अपक्ष रेश्मा काळे आणि अपक्ष अनिल चौधरी हे चार उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कायम आहेत. एकूणच, १२ उमेदवारांच्या माघारीनंतर जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत आता महाजन, तायडे, काळे आणि चौधरी यांच्यात थेट चौरंगी सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव महायुतीमध्ये बंडखोरी
दरम्यान, अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असलेल्या रेश्मा काळे या जळगाव महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका असल्याने महायुतीसमोर अंतर्गत बंडखोरीचे आव्हान उभे राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीतील मतांचे विभाजन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक चुरशीची होणार
तसेच भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय कायम ठेवल्याने निवडणूक अधिक रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची संख्या आणि राजकीय समीकरणे लक्षात घेता येत्या मतदानात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button