PoliticsSocial

जळगावच्या इतिहासात प्रथमच DLP मधून रस्त्यांची दुरुस्ती; प्रभाग १३ मधील रस्ते होणार खड्डेमुक्त!

नगरसेविका वैशाली पाटील व नितीन सपके यांच्या मागणीला यश : निधीची प्रतीक्षा न करता DLPचा प्रभावी वापर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी आता महापालिकेने उपलब्ध असलेल्या DLP (Defect Liability Period) चा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच DLPच्या माध्यमातून रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, प्रभाग क्रमांक १३ मधील पाच प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

नगरसेविका वैशाली पाटील आणि नितीन सपके यांनी सातत्याने केलेल्या मागणीनंतर या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे निधी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा न करता, ज्या रस्त्यांची DLPची मुदत अद्याप शिल्लक आहे, त्या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदारांकडून करून घेण्याचा मार्ग महापालिकेसमोर खुला झाला आहे.

प्रभाग १३ मधील या पाच रस्त्यांचा समावेश
DLP अंतर्गत दुरुस्ती करण्यात येणाऱ्या रस्त्यांमध्ये महाबळ परिसर, डी मार्ट ते गिरणा टाकी, काव्य रत्नावली चौक ते राजमाता जिजाऊ चौक, संभाजी नगर स्टॉप ते मोहाडी रोड आणि मोहाडी रोड ते संत गाडगे बाबा चौक या पाच प्रमुख मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांसह पादचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यांची वास्तविक स्थिती लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे या दुरुस्तीच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

DLP म्हणजे नेमके काय?
रस्ता तयार करून संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरित केल्यानंतर ठराविक कालावधीसाठी Defect Liability Period (DLP) लागू असतो. या कालावधीत रस्त्याच्या कामात दोष निर्माण झाल्यास किंवा रस्ता खराब झाल्यास त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. साधारणपणे रस्त्याच्या कामानुसार दोन ते पाच वर्षांपर्यंत DLPचा कालावधी असू शकतो. या कालावधीत रस्ता खराब झाल्यास महापालिकेने स्वतंत्र निधी खर्च करण्याऐवजी करारातील अटींनुसार संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेता येते. यामुळे महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार न टाकता रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती करून घेणे शक्य होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात
प्रभाग १३ मधील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. DLPच्या अटींनुसार संबंधित रस्त्यांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली. DLPच्या माध्यमातून होणाऱ्या या दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेवरही लक्ष ठेवण्याची आवश्यकता असून, रस्ता पुन्हा खराब झाल्यास संबंधित ठेकेदाराकडूनच दुरुस्ती करून घेणे शक्य होणार आहे.

शहरातील इतर DLP रस्त्यांचीही माहिती मागविली
प्रभाग १३ मध्ये DLPचा प्रभावी वापर सुरू झाल्यानंतर आता शहरातील DLPची मुदत शिल्लक असलेल्या इतर रस्त्यांची माहितीही महापालिकेकडून मागविण्यात आली आहे. शहरातील अनेक रस्ते खड्ड्यांमुळे खराब झाले असून, निधीअभावी अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे रखडतात. अशा परिस्थितीत DLPची मुदत शिल्लक असलेल्या रस्त्यांची यादी तयार करून संबंधित ठेकेदारांकडूनच दुरुस्ती करून घेतल्यास महापालिकेच्या निधीची बचत होऊ शकते.

DLP चा वापर करून शहरातील रस्ते दुरुस्त करणार
शहरातील इतर DLP शिल्लक असलेल्या रस्त्यांची माहिती मागविण्यात आली असून, त्यानुसार आवश्यक त्या रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्यात येणार असल्याचे नगरसेविका वैशाली पाटील यांनी सांगितले. प्रभाग १३ मध्ये सुरू झालेला हा उपक्रम केवळ एका प्रभागापुरता मर्यादित न राहता संपूर्ण शहरासाठी उपयुक्त ठरू शकतो. इतर नगरसेवकांनीही त्यांच्या प्रभागातील DLPची मुदत शिल्लक असलेल्या रस्त्यांची माहिती घेऊन दुरुस्तीसाठी पाठपुरावा केल्यास महापालिकेच्या अतिरिक्त निधीशिवाय शहरातील अनेक खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती होऊ शकते.

निधी खर्च करण्याआधी उपलब्ध यंत्रणेचा वापर गरजेचा
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन निधीची मागणी करण्याऐवजी आधीच झालेल्या कामांच्या करारातील DLPच्या तरतुदींचा वापर करणे ही महापालिकेसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बाब ठरू शकते. प्रभाग १३ मध्ये सुरू झालेली ही कार्यवाही त्यामुळे “निधी कुठून आणायचा?” या प्रश्नाऐवजी “उपलब्ध करारातून काम कसे करून घ्यायचे?” याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधणारी ठरली आहे. आता महापालिका शहरातील DLP शिल्लक असलेल्या रस्त्यांची माहिती घेऊन प्रत्यक्षात किती रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदारांकडून करून घेते, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button