Social

मायेचा स्पर्श, विश्वासाचा आधार; धिवरे परिवाराचे पोलीस कुटुंबियांशी हितगुज!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पोलीस कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या कुटुंबीयांच्या भावना, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पत्नी सानिका धिवरे तसेच मातोश्री श्रीमती उषा धिवरे यांनी आज जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस शिपाई निवासस्थानांना सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पोलीस कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीय आणि विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला.

या भेटीमागील मुख्य उद्देश पोलीस कुटुंबीयांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या, गरजा आणि अपेक्षा जाणून घेणे तसेच त्यांचे मनोबल वाढविणे हा होता. निवासस्थानांमध्ये जाऊन त्यांनी प्रत्येक कुटुंबाशी सविस्तर चर्चा केली. पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, मुलांच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्न, आरोग्यविषयक समस्या, निवासस्थानांतील सुविधा आणि दैनंदिन जीवनातील विविध बाबींबाबत त्यांनी माहिती घेतली.

कर्मचाऱ्यांच्या यशामागे कुटुंबीयांचा मोलाचा वाटा
यावेळी बोलताना त्यांनी, पोलीस कर्मचाऱ्यांचे जीवन अत्यंत जबाबदारीचे आणि आव्हानात्मक असल्याचे नमूद केले. समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबीयांचा मोलाचा वाटा असतो. कुटुंबीयांनी दिलेला मानसिक आधार आणि पाठिंबा हा प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेचा भक्कम पाया असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

विद्यार्थ्यांशी साधला विशेष संवाद
भेटीदरम्यान शिपाई निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी विशेष संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेत स्पर्धा परीक्षा, करिअरच्या संधी, अभ्यासातील आव्हाने आणि भविष्यातील उद्दिष्टांबाबत मार्गदर्शन केले. नियमित अभ्यास, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि सकारात्मक विचारसरणी यशाचा मार्ग सुकर करतात, असे सांगत विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.

हेल्मेट वापरा, व्यसनमुक्त रहा
कुटुंबीयांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची त्यांनी संवेदनशीलतेने दखल घेत संबंधित बाबी योग्य स्तरावर तत्काळ पोहोचविण्याचे आश्वासन दिले. या संवादामुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये आपुलकी आणि विश्वासाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. याशिवाय पोलिस अमलदारांच्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता हेल्मेटचा अनिवार्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच व्यसनमुक्त जीवनशैली, योग्य आहार आणि निरोगी आरोग्याचे महत्त्व याविषयीही उपस्थितांशी चर्चा करण्यात आली.

कुटुंबियांनी मांडल्या समस्या, चिमुकल्यांना मिळाला खाऊ
कार्यक्रमादरम्यान उपस्थित लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी मिठाई व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुटुंबीयांच्या डोळ्यांतील समाधान या उपक्रमाचे यश अधोरेखित करत होते. अनौपचारिक वातावरणात झालेल्या या आत्मीय संवादामुळे कुटुंबीयांना आपल्या भावना आणि समस्या मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली.

पोलीस दल आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील विश्वासाचे बंध अधिक दृढ करण्यासोबतच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि मानसिक सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सदिच्छा भेटीमुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button