Special

जळगावात स्पा सेंटर पुन्हा ‘फुल्ल’; कारवाईचा धसका संपला की पाठबळ पुन्हा मिळाले?

‘महा पोलीस न्यूज’च्या वृत्तानंतर झाली होती कारवाई; जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात काही काळ शांत झालेला स्पा सेंटरचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्यावर्षी ‘महा पोलीस न्यूज’ने शहरातील स्पा सेंटरमध्ये सुरू असल्याच्या कथित गैरप्रकारांवर प्रकाश टाकत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या वृत्ताची दखल घेत जळगाव पोलिसांनी एका स्पा सेंटरवर कारवाई केली होती. त्यानंतर कारवाईचा धसका घेत अनेक सेंटर बंद पडले, तर काही ठिकाणी सुरू असल्याच्या चर्चा असलेले कथित अवैध प्रकारही काही काळ थांबले होते. मात्र, आता पुन्हा शहरातील विविध भागांत स्पा सेंटर सुरू झाल्याने ‘कारवाईचा धसका संपला की पुन्हा कुणाचा हात डोक्यावर?’ असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील मध्यवर्ती भागासह विविध परिसरांत पुन्हा स्पा आणि मसाज सेंटर सुरू झाल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी पूर्वी बंद झालेले व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी झालेल्या पोलिस कारवाईनंतर नेमके काय बदलले आणि आता पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर कशी आली, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

एका कारवाईनंतर धसका… पण आता पुन्हा तेच चित्र!
‘महा पोलीस न्यूज’च्या वृत्तानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये काही काळ धास्ती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी शटर बंद झाले होते. काही सेंटरमधील कथित गैरप्रकारांनाही लगाम बसल्याचे चित्र होते. त्यामुळे प्रशासनाने या व्यवसायावर लक्ष ठेवले तर परिस्थिती नियंत्रणात राहू शकते, हे स्पष्ट झाले होते. मात्र, आता पुन्हा स्पा सेंटरची संख्या वाढताना दिसत असेल, तर संबंधित यंत्रणांच्या नियमित तपासणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. एकदा कारवाई करून प्रकरण थंडावले की पुढे काय? याचे उत्तर प्रशासनाने जनतेला देण्याची वेळ आली आहे.

‘आशीर्वाद’ नेमका कुणाचा?
स्पा सेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, व्यवसायाची कायदेशीरता, कामगारांची नोंदणी, अग्निसुरक्षा, आरोग्यविषयक नियम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अटी आणि इतर लागू नियमांचे पालन होते का, याची तपासणी संबंधित विभागांनी करणे अपेक्षित आहे. मात्र, जर अनधिकृत किंवा नियमबाह्य पद्धतीने सेंटर सुरू असतील आणि त्यांच्यावर वारंवार कारवाई होत नसेल, तर या निष्क्रियतेमागे कारण काय? काही सेंटरना प्रशासनातील व्यक्तींचे संरक्षण आहे का? हप्तेखोरीच्या चर्चा केवळ अफवा आहेत की त्यामागे काही तथ्य आहे? या प्रश्नांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

सोशल मीडियावर जाहिरातींचा धडाका
स्पा सेंटरची जाहिरात आता केवळ फलकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. सोशल मीडियावर आकर्षक व्हिडिओ, विविध ऑफर्स आणि मसाज सेवांची माहिती देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा सेंटरच्या जाहिरातींचीही संबंधित यंत्रणांनी दखल घ्यावी. जाहिरात खुलेआम होत असेल, व्यवसाय सुरू असेल आणि तरीही संबंधित विभागांना त्याची माहिती नसेल, तर ही यंत्रणांच्या कार्यक्षमतेची बाब गंभीर बनते.

कथित ‘अतिरिक्त सेवा’ पुन्हा चर्चेत
यापूर्वी ‘महा पोलीस न्यूज’च्या वृत्तात काही ग्राहकांनी मसाजच्या नावाखाली अतिरिक्त सेवांचे आमिष दाखवले जात असल्याचे दावे केले होते. त्या वेळी या दाव्यांवरूनच शहरात मोठी चर्चा झाली होती आणि त्यानंतर पोलिस कारवाईही झाली. आता पुन्हा अशाच स्वरूपाच्या तक्रारी किंवा चर्चा समोर येत असतील, तर त्या केवळ कानगोष्टी म्हणून दुर्लक्षित करण्याऐवजी गुप्त पथक, बनावट ग्राहकांच्या माध्यमातून कायदेशीर तपासणी आणि संयुक्त छापेमारी करून सत्यता पडताळणे गरजेचे आहे.

महापालिका, पोलीस, कामगार विभागाची संयुक्त तपासणी कधी?
शहरात पुन्हा स्पा सेंटर सुरू होत असतील, तर संबंधित यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवण्याची गरज आहे. पोलीस, महापालिका, कामगार विभाग, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित विभागांनी संयुक्त तपासणी करून प्रत्येक सेंटरची कागदपत्रे, परवाने, कामगारांची माहिती आणि नियमांचे पालन तपासावे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी आणि सर्व काही कायदेशीर असल्यास संबंधित व्यवसायांना विनाकारण त्रास देऊ नये. मात्र, सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे तपासणी होतेय तरी कुठे?

कारवाईचा फक्त ‘शो’ नको; कायमस्वरूपी यंत्रणा उभी करा!
एका सेंटरवर कारवाई केल्यानंतर काही दिवस वातावरण तापते आणि नंतर पुन्हा पूर्वीचीच परिस्थिती निर्माण होत असेल, तर त्याचा अर्थ कारवाई परिणामकारक ठरली का, याचा प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. जळगावकरांना अधूनमधून छापे नकोत; नियमबाह्य व्यवसायांवर सातत्यपूर्ण आणि पारदर्शक कारवाई हवी आहे. जर सर्व स्पा सेंटर कायदेशीर नियमांचे पालन करत असतील तर प्रशासनाने ते स्पष्ट करावे. आणि जर नियमबाह्य प्रकार सुरू असतील तर संबंधितांवर कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई करावी.

‘महा पोलीस न्यूज’चा सवाल
गेल्यावर्षी वृत्त प्रसिद्ध झाले, पोलिसांनी कारवाई केली, अनेक सेंटर बंद पडले आणि आता पुन्हा सेंटर सुरू होत आहेत… मग या काळात प्रशासनाने नेमके काय केले? पुन्हा कारवाई होण्यासाठी आणखी एखादे वृत्त प्रसिद्ध होण्याची वाट पाहिली जात आहे का? जळगाव शहरात पुन्हा सुरू झालेल्या स्पा सेंटरचे कायदेशीरता, परवाने, नियमांचे पालन आणि कथित गैरप्रकारांची चौकशी करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने झोपेतून जागे होऊन संयुक्त तपासणी मोहीम राबवावी आणि कारवाईचा स्पष्ट अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button