कोरोनावर मात केली, आता नियोजनातून दुष्काळावरही विजय मिळवू!
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विश्वास ; पाणी, वीज, चारा आणि पीकविम्याच्या प्रश्नांवर तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

कोरोनावर मात केली, आता नियोजनातून दुष्काळावरही विजय मिळवू!
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विश्वास ; पाणी, वीज, चारा आणि पीकविम्याच्या प्रश्नांवर तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
जळगाव, (प्रतिनिधी) : कोरोना महामारी आणि चिकुनगुनियासारख्या साथीच्या संकटांचा एकजुटीने सामना केला, त्याच धर्तीवर योग्य नियोजन, पूर्वतयारी आणि प्रशासकीय समन्वयाच्या बळावर दुष्काळी परिस्थितीवरही मात करता येईल. मात्र, त्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने आणि ‘मिशन मोड’वर काम करणे आवश्यक आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. कर्तव्यात हलगर्जीपणा किंवा विनापरवानगी गैरहजेरी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

पारोळा तहसील कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पारोळा, एरंडोल व भडगाव तालुक्यांतील विविध विभागांची प्रशासकीय आढावा बैठक झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चारा नियोजन, शेतीपंपांचा वीजपुरवठा, पीकविमा, पीक नुकसानीचे पंचनामे, जलसंधारण, भूजल पातळी, रोजगार हमी योजना, शेतकरी कर्जमुक्ती, घरकुल योजना आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, दुष्काळाचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांना बसतो. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याची वाट न पाहता आतापासूनच पाणीटंचाई निवारण, विहिरींची दुरुस्ती, जलसंधारण आणि पाणंद रस्त्यांच्या कामांना गती द्यावी. जनतेशी संवाद साधताना सौजन्यपूर्ण भूमिका ठेवून त्यांच्या समस्या तत्परतेने सोडवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महावितरणला २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश
शेतीपंपांच्या वीजपुरवठ्याबाबत येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ट्रान्सफॉर्मर, केबल, फ्यूज किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो त्वरित पूर्ववत करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा २४ तास सतर्क ठेवावी. जल जीवन मिशनअंतर्गत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य देऊन उर्वरित कामे लवकर पूर्ण करावीत. प्रलंबित वीजजोडण्यांसाठी महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
१८१ दिवसांचा चारा उपलब्ध; तरीही नियोजनात कसूर नको
सद्यस्थितीत १८१ दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मात्र, उपलब्ध साठ्यावर विसंबून न राहता भविष्यातील गरजांचा विचार करून पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच नियोजन करावे. पाण्याची सुविधा असलेल्या योग्य शासकीय तसेच वनविभागाच्या जमिनींवर चारा लागवडीचे नियोजन करावे. जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा कमी पडणार नाही, यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
पीकविमा तक्रारींचे तातडीने निराकरण करा
पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे निराकरण करावे, असे निर्देश देण्यात आले. आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करावी. डेंग्यू आणि इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये तसेच बाजारपेठांच्या परिसरात आवश्यकतेनुसार आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरे आयोजित करावीत. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने रात्रीची गस्त वाढवावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.
एरंडोलमध्ये आदिवासी विकास विभागाचे कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न
आमदार अमोल पाटील यांनी केलेल्या मागणीचा उल्लेख करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एरंडोल येथे आदिवासी विकास विभागाचे उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. याबाबत आदिवासी विकास मंत्र्यांची भूमिकाही सकारात्मक असून, हे कार्यालय एरंडोल येथेच सुरू व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी हितासाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक : आमदार अमोल पाटील
दुष्काळी परिस्थितीत महसूल, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, पंचायत समिती आणि इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे आवाहन आमदार अमोल पाटील यांनी केले. शेतकऱ्यांना वेळेत पीकविम्याचा लाभ मिळावा, जलतारा पॉइंट्सची कामे पूर्ण व्हावीत आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘जलधारा’ पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात पारोळा-एरंडोल मतदारसंघातून होत असून, या उपक्रमाचा शेतकरी आणि ग्रामस्थांना लाभ होईल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा
बैठकीत प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी विविध विषयांचे सादरीकरण केले. पारोळ्याचे तहसीलदार उल्हास देवरे, एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील आणि भडगावच्या तहसीलदार शीतल सोलट यांनी आपापल्या तालुक्यांतील पीकविमा, नुकसान पंचनामे, शेतकरी कर्जमुक्ती, रोजगार हमी योजना, पेरणी, पर्जन्यमान, पीककापणी प्रयोग, भूजल स्थिती, पाणंद रस्ते, घरकुल योजना, महसूल समाधान शिबिरे आणि सेवा संकल्प अभियानासह विविध योजनांच्या प्रगतीची माहिती दिली.
यावेळी महसूल, कृषी, महावितरण, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, वन, आरोग्य, जलसंधारण, ग्रामपंचायत आणि नगरपालिका या विभागांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.
अधिकारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार उल्हास देवरे, गोपाळ पाटील व शीतल सोलट, नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, वासुदेव पाटील, मधुकर पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष चतुर भाऊसाहेब पाटील यांच्यासह संबंधित गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.







