लाख मोलाचा ठरणार यंदाचा बहिणाबाई महोत्सव, १० मान्यवरांचा ‘रायझिंग जळगाव’ने सन्मान

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । भरारी फाऊंडेशन, जळगांव आयोजित खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना व लघु उद्योजकांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव २०२५ याचे दहाव्या वर्षाचे आयोजन दि.२३ ते २७ जानेवारी २०२५ बॅ. निकम चौक, सागर पार्क, जळगाव या ठिकाणी करण्यात आले आहे. यंदा १ लाख नागरिक महोत्सवाला भेट देण्याची शक्यता असल्याची माहिती भरारीचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी दिली.
भरारी फाऊंडेशनच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला दीपक परदेशी, विनोद ढगे, डॉ.दीपक पाटील, जयेश पाटील, विक्रांत चौधरी, चित्रा चौधरी, रोहिणी मोराडे, वर्षा महाजन आदी उपस्थित होते. प्रसंगी बोलताना आयोजकांनी, यंदा जेष्ठ समाजसेवक दलूभाऊ जैन, कोठारी उद्योग समूहाचे रजनीकांत कोठारी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, वाचन संस्कृती रुजण्यासाठी ८ बाय १२ फुट पुस्तकाची प्रतिकृती साकारणार आहेत. महाराष्ट्र सॅटर्ड क्लब देखील यंदा जुळलेला असून २६० स्टॉल असणार आहेत. त्यात राज्यभरातील उद्योग आणि बचतगटांचा समावेश आहे. मुंबई येथील नायर हॉस्पिटल डॉ.विरेन ठक्कर यांचे पथक मोफत अँक्युपंक्चर शिबीर घेणार आहे. जालिंदर सुपेकर, अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध व्यंजनांचा घेता येणार आस्वाद
खान्देशातील महिला बचत गट व लघु उद्योजकांनी निर्माण केलेल्या वस्तुंना हक्काची बाजार पेठ निर्माण व्हावी, त्यांनी निर्माण केलेल्या वस्तुंना योग्यतो भाव मिळावा व त्यातुन त्यांची आर्थिक उन्नती व विकास व्हावा. हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बहिणाबाई महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे बहिणाबाई खाद्य महोत्सव बचत गटाने तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थाना जळगांव नागरीकांची विशेष मागणी असते भरीत भाकरी, शेवभाजी, खापरावरची पुरणपोळी सह खान्देशातील विविध खाद्य पदार्थांचा या महोत्सवाच्या निमित्ताने जळगांवकर नागरीक आस्वाद घेत असतात.
चला हवा करूयासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
बहिणाबाई महोत्सवात विशेष आकर्षण म्हणजे दि.२४ रोजी सिने अभिनेत्री श्रेया बुगडे व सिने अभिनेता कुशल बद्रिके यांचा ‘चला हवा करूया” हा कार्यक्रम होणार आहे. तसेच ‘ही लावणी महाराष्ट्राची” सुप्रसिद्ध लावणीकलावंत शाहीर मीरा दळवी पुणे सादर करणार आहे. शाहीर सुमित धुमाळ आणि सहकारी छत्रपती संभाजी नगर यांचा ‘शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण” शाहिरी पोवाडा व पारंपारिक गोंधळचा कार्यक्रम तर अकोला येथील प्रसिद्ध भारुडकर विद्या भगत यांचा ‘भारुड प्रबोधनाचे” हा कार्यक्रम या महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी साज मेकअप स्टुडिओ यांच्या वतीने ‘मराठी संस्कृतीचा फॅशन शो” चे आयोजन या महोत्सवात करण्यात आलेले आहे. खान्देशातील विविध लोककला शाहीरी, भारूड, लोकगीते, लोकनृत्य, वहीगायन, आदी लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन युवा कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी बहिणाबाई महोत्सवाचा सांस्कृतिक मंच खुला ठेवण्यात आला आहे.
१० मान्यवरांचा ‘रायझिंग जळगाव’ पुरस्काराने गौरव
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग व महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. खान्देशासह राज्यभरात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी बहिणाबाई महोत्सवात जळगाव शहराला उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात विकसित शहर करणाऱ्या व्यक्तींचा ‘रायझिंग जळगाव” या सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.
५ दिवसात १ लाख नागरिक लावणार हजेरी
गत नऊ वर्षात जळगांव शहरातील नागरीकांसह जिल्हाभरातुन मोठ्या संख्येने नागरीकांनी हजेरी लावली आहे. यावर्षी देखील अंदाजे १ लाख नागरीक या महोत्सवाला भेट देतील असा अंदाज असुन त्यानुसार संपुर्ण महोत्सवाचे आयोजन नियोजन करण्यात आले आहे. बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या वर्षाचे आयोजन विविध कार्यक्रमासह खाद्य संस्कृती व लोककलेच्या जागराने रंगणार असून जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात हजेरी लावून जळगावच्या सर्वात मोठ्या लोक उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.