अमळनेरमध्ये साक्ष देण्याच्या वादातून डंपरखाली चिरडून एकाची हत्या
चार जणांविरुद्ध गुन्हा; डंपरचालक अटकेत, आमदार अनिल पाटील यांची रुग्णालयात धाव

अमळनेरमध्ये साक्ष देण्याच्या वादातून डंपरखाली चिरडून एकाची हत्या
चार जणांविरुद्ध गुन्हा; डंपरचालक अटकेत, आमदार अनिल पाटील यांची रुग्णालयात धाव
अमळनेर, प्रतिनिधी : विरोधात साक्ष देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला वाळूच्या डंपरखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील नांद्री बसस्थानकाजवळ ३१ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. शरद रतन पाटील (रा. नगाव बुद्रुक) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात विपुल गोसावी, मयूर बोरसे, सागर गोसावी आणि डंपरचालक भरत सुभाष पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. घटनेनंतर पळून गेलेल्या डंपरचा पोलिसांनी पाठलाग करून बुधगाव येथे शोध घेतला असून, चालकाला रात्रीच अटक करण्यात आली.
जुन्या वादातून धमकी दिल्याचा आरोप
नगाव बुद्रुक येथील ज्ञानेश्वर काळूगिर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ते अंगणात दुचाकी लावत असताना वाळूचे ट्रॅक्टर खाली करण्यासाठी आलेल्या विपुल किरण गोसावी, सागर संजय गोसावी आणि मयूर अनिल बोरसे यांच्या ट्रॅक्टरचा त्यांना धक्का लागला. यावरून विचारणा करण्यासाठी गेले असता, विपुल, सागर, संजयगिर गोसावी आणि मयूर यांनी ज्ञानेश्वर गोसावी व त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसऱ्या दिवशी तलाठी महेंद्र पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यावेळी शरद रतन पाटील हे साक्षीदार होते. यानंतर विपुल गोसावी याने शरद पाटील यांना विरोधात साक्ष दिल्यास रस्त्यावर चिरडून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या धमकीनंतर लोकांनी समजूत घातल्यामुळे शरद पाटील यांनी त्यावेळी पोलिसांत तक्रार दिली नव्हती.
नांद्री बसस्थानकाजवळ गाठून हल्ला
३१ ऑक्टोबर रोजी रात्री पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पाटील यांच्यासह काही जण सावखेडा येथील देव हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होते. रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास नांद्री बसस्थानकाजवळ पातोंड्याच्या दिशेने आलेल्या राखाडी रंगाच्या मारुती कारने महेश आत्माराम पाटील यांना कट मारला आणि कार पुढे गेली.
काही अंतरावर कार थांबल्यानंतर त्यातून विपुल गोसावी, मयूर बोरसे आणि सागर गोसावी खाली उतरले. त्याचवेळी पातोंड्याच्या दिशेने येणाऱ्या एचआर ३७ डी ८९५७ क्रमांकाच्या डंपरचा चालक भरत सुभाष पाटील खाली उतरून शिवीगाळ करू लागला. यावेळी प्रवीण गोसावी यांनी तुम्ही माणसे मारायला निघाला आहात का, अशी विचारणा केली.
शरद पाटील यांना डंपरसमोर ढकलल्याचा आरोप
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, विपुल गोसावी याने डंपरचालक भरत पाटील याला संबंधितांना चिरडून टाकण्यास सांगितले. त्यानंतर चालकाने डंपर वेगाने त्यांच्या अंगावर नेला. विपुल गोसावी आणि मयूर बोरसे यांनी शरद पाटील यांना डंपरसमोर ढकलल्याचा आरोप आहे. सागर गोसावी याने चंद्रशेखर पाटील यांनाही ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
डंपरखाली आल्याने शरद पाटील यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर चौघेही घटनास्थळावरून पळून गेले. जखमी शरद पाटील यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे अमळनेर येथील नर्मदा फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी धुळ्याकडे रवाना करण्यात आले; मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
आमदारांची रुग्णालयात धाव; पोलिसांची शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच आमदार अनिल पाटील यांनी रात्री रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि उपचारांसाठी ५० हजार रुपयांची मदत केली. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनीही घटनास्थळी भेट दिली.
आमदार अनिल पाटील यांनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली. दहिवद फाटा आणि पिंपळी मार्गे पळून गेलेल्या डंपरचा शोध घेत पोलिसांनी तो बुधगाव येथे पकडला. डंपरचालक भरत सुभाष पाटील याला रात्रीच अटक करण्यात आली. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करीत आहेत.







