कोळगावात महात्मा फुले स्मारकासाठी जागा द्या; ग्रामस्थांचा इशारा

कोळगावात महात्मा फुले स्मारकासाठी जागा द्या; ग्रामस्थांचा इशारा
२५ ऑक्टोबरपर्यंत लेखी निर्णयाची मागणी; अन्यथा २६ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण
भडगाव, प्रतिनिधी : कोळगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीवर २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लेखी निर्णय घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अन्यथा २६ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
कोळगाव येथे महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याबाबत १४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत गणपती मंदिराजवळील जागेबाबत चर्चा झाली होती. मात्र, या चर्चेनंतरही अद्याप अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्मारकाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून ग्रामपंचायतीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
२५ ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याची मागणी
महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्मारक उभारणे आवश्यक असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या मागणीची तातडीने दखल घेऊन २५ ऑक्टोबरपर्यंत जागेबाबत लेखी निर्णय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत निर्णय न झाल्यास २६ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्याने आता ग्रामपंचायत प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.







