महापालिका अधिकाऱ्यांच्या दालनातील AC वर आक्षेप; शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप

महापालिका अधिकाऱ्यांच्या दालनातील AC वर आक्षेप; शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप
जळगाव: जळगाव महानगरपालिकेतील काही अधिकारी वर्गाच्या दालनांमध्ये कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मंजुरी किंवा शासकीय नियमांची पूर्तता न करता बेकायदेशीरपणे एअर कंडिशनर (AC) बसविण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र काशिनाथ सपकाळे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन हे नियमबाह्य AC तातडीने हटवावेत आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
सार्वजनिक निधीवर चालणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रत्येक खर्च कायदेशीर मंजुरी, पारदर्शक प्रक्रिया आणि आर्थिक नियमांचे पालन करूनच होणे बंधनकारक आहे. त्यामुळे AC बसविण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी, अंदाजपत्रकीय तरतूद किंवा निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
एकीकडे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना साध्या मूलभूत सुविधांसाठी तासन्तास ताटकळत राहावे लागते, अनेक ठिकाणी पंख्यांचीही पुरेशी व्यवस्था नाही, तर दुसरीकडे अधिकारी मात्र जनतेच्या पैशातून वातानुकूलित दालनांचा उपभोग घेत असल्याचे चित्र असल्याचा दावा सपकाळे यांनी केला आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा. तसेच चौकशीत हे AC नियमबाह्य आढळल्यास ते तात्काळ हटवून त्यांच्या खरेदीचा, बसवण्याचा आणि वीज वापराचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक पगारातून वसूल करण्यात यावा. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ऊर्जा बचत धोरणाचे उल्लंघन झाले आहे का, हे तपासावे अशी मागणीही करण्यात आली असून निवेदनासोबत पुरावे म्हणून संबंधित AC चे फोटो जोडण्यात आले आहेत.
या निवेदनावर महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई न केल्यास माहिती अधिकाराचा वापर करणे, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडणे, तसेच उच्च न्यायालयात किंवा सक्षम न्यायालयात याचिका दाखल करून कायदेशीर लढा देण्याचा इशारा शैलेंद्र सपकाळे यांनी दिला आहे.







