गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल


गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल
जिल्हाधिकारी रोहन घुगे; अहिंसा सद्भावना शांती यात्रेतून समतेचा संदेश
जळगाव, प्रतिनिधी : जगात संघर्ष, अस्थिरता आणि परस्परावलंबित्व वाढत असताना महात्मा गांधी यांच्या अहिंसा, शांतता आणि सद्भावनेच्या विचारांची आज अधिक गरज आहे. स्वदेशी, स्वच्छता, ग्रामविकास, पारंपरिक व्यवसायांचे जतन, श्रमदान आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा स्वीकार केल्यानेच सुजाण नागरिक म्हणून सक्षम पिढी घडेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती तसेच विश्व अहिंसा दिनानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. लालबहादूर शास्त्री टॉवरपासून सुरू झालेल्या या यात्रेची सांगता महात्मा गांधी उद्यानात झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे बोलत होते.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, उपवनसंरक्षक अधिकारी सौरेश सहाय, मनपा आयुक्त आदित्य जीवने, प्रांत अधिकारी योगेश कुमार मीणा, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, राजेंद्र मयूर, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन गीता धरमपाल आणि अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उदय महाजन व गीता धरमपाल यांनी मान्यवरांचे तिरंगा सूतीहार देऊन स्वागत केले. खासदार स्मिता वाघ यांनी उपस्थितांना अहिंसेची शपथ दिली. प्रारंभी दीपस्तंभच्या दिव्यांग कलाकारांनी ‘वैष्णव जन तो तेणे कहिए…’ हे गीत सादर केले.
अहिंसा सद्भावना शांती यात्रेतून एकतेचा संदेश
लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून अहिंसा सद्भावना शांती यात्रेला सुरुवात केली. पंडित नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. हेडगेवार चौक मार्गे ही यात्रा महात्मा गांधी उद्यानात पोहोचली. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास सूतीहार अर्पण करून यात्रेची सांगता करण्यात आली.
यात्रेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भारतमाता, कस्तुरबा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासह राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. बैलगाडीवरील चरख्यावर अखंड सुतकताई करण्यात येत असल्याचा सजीव देखावा विशेष आकर्षण ठरला. विविध शाळा व संस्थांचे विद्यार्थी तसेच जळगावकर नागरिक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले.
गांधीजींच्या विचारांचा आचरणातून संदेश
जिल्हाधिकारी रोहन घुगे पुढे म्हणाले की, गांधीजींचे जीवन जवळून पाहिल्यास त्यांच्या महानतेचे कारण त्यांनी कधीही चुका केल्या नाहीत हे नव्हे, तर स्वतःच्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारून त्यांची पुनरावृत्ती होऊ दिली नाही, हे लक्षात येते. ‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्तकातून त्यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंग मोकळेपणाने मांडले.
सत्य, अहिंसा, स्वदेशी, सद्भावना, श्रमदान आणि स्वच्छता या मूल्यांचा संदेश गांधीजींनी केवळ शब्दांतून दिला नाही, तर स्वतःच्या आचरणातून समाजासमोर ठेवला. ‘बोले तैसा चाले’ हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद होती. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा आजच्या पिढीने आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शास्त्रीजींच्या काळात देशाने अन्नटंचाईसह अनेक आव्हानांचा सामना केला. त्यातून हरितक्रांती, दुग्ध सहकार आणि अन्नसुरक्षेच्या दिशेने देशाने वाटचाल केली. गांधीजींच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी जळगावातील गांधी रिसर्च फाउंडेशन महत्त्वाचे कार्य करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अनुभूती बालनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण
अनुभूती बालनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी ‘गांधीजी के बंदर हम’ हे गीत अभिनयासह सादर केले. शुभदा नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थम अथांग जैन, लिटसा मनीष जैन, आरव हर्षद जैन, अनायशा आशिष बन्सल आणि रचित कुणाल राजपूत यांनी सहभाग घेतला.
‘भारत की संतान’मधून विविधतेतील एकतेचा संदेश
‘भारत की संतान’ हा विविधतेतील एकतेचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. ‘आम्ही सर्व एक आहोत’ हा या कार्यक्रमाचा प्रमुख संदेश होता. नरेंद्र वडगावकर यांनी कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले.
भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या १८ भाषांमधील विविधता, संबंधित भाषिक प्रदेशांची वेशभूषा आणि संस्कृतीचे दर्शन नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी घडविले. विविधतेतून एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे हे सादरीकरण उपस्थितांना भावले.
सामूहिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
गांधी जयंतीनिमित्त गांधीतीर्थ जिल्हास्तरीय सामूहिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागातील एकूण २६ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक ब. गो. शानभाग विद्यालयाने पटकावला. विजेत्या संघाला ११ हजार रुपये रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सादर केलेले गीतही यावेळी सादर केले.
ग्रामीण विभागात धनाजी नाना माध्यमिक विद्यालय, खिरोदा यांनी प्रथम, विद्याभारती माध्यमिक विद्यालय, विरवाडे यांनी द्वितीय, र. सु. जैन विद्यालय, तोंडापूर, जामनेर यांनी तृतीय, तर एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, वावडदा यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
शहरी विभागात ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलने प्रथम, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलने द्वितीय, अनुभूती इंटरनॅशनल स्कूल, शिरसोली रोड, जळगावने तृतीय, तर काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
विविध शाळांचा उत्स्फूर्त सहभाग
अहिंसा सद्भावना शांती यात्रेत इम्पिरियल इंग्लिश मीडियम स्कूल, अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, हरिजन कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनी, शोधग्रामचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, ब. गो. शानभाग विद्यालय, एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, या. दे. पाटील माध्यमिक विद्यालय, सरस्वती प्राथमिक विद्यालय, ला. ना. सार्वजनिक विद्यालय, एनसीसी बटालियन, खिरोदा येथील धनाजी नाना माध्यमिक विद्यालय, हरिजन कन्या छात्रालय, इम्पीरियल स्कूल तसेच गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमातील विद्यार्थी आणि जळगावकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीष कुलकर्णी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.







