माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी विशाल सुरवाडे यांचे आमरण उपोषण

माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी विशाल सुरवाडे यांचे आमरण उपोषण
जळगाव : रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खान्देश रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेच्या वतीने विशाल सुरवाडे हे कामगार आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले असून प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची अजून कोणतीही दखल घेतलेली नाही.
विशाल सुरवाडे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत पुढील मागण्या केल्या आहेत टोली क्रमांक ८ पुनर्जीवित करणे, सन २०२४ मधील थकीत भाववाढीची फरक रक्कम कामगारांना मिळवून देणे तसेच सन २०२५-२६ ची महागाई निर्देशांकानुसार नवीन भाववाढ लागू करणे, या प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
संघटनेचे प्रतिनिधी विशाल अजय सुरवाडे यांनी संबंधित प्रशासनाकडे गेल्या दोन वर्षांपासून विविध पत्रव्यवहार व लेखी निवेदने करूनही मागण्यांवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे.
रेल्वे मालधक्क्यावरील बंद असलेली टोली क्रमांक ८ तात्काळ पुनर्जीवित करून संबंधित हमालांना काम उपलब्ध करून द्यावे, तसेच सन २०२४ ची थकीत भाववाढ फरक रक्कम संबंधित मालकांकडून वसूल करून कामगारांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सन २०२५-२६ साठी महागाई निर्देशांकानुसार नवीन दरपत्रक लागू करून त्यानुसार फरकाची रक्कम देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात प्रशासनावर कथित राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.







