जळगाव शहर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी; घरफोडी करणारे दोन अट्टल चोर जेरबंद

जळगाव शहर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी; घरफोडी करणारे दोन अट्टल चोर जेरबंद
अवघ्या पाच तासांत गुन्ह्याची उकल; ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याची अवघ्या पाच तासांत उकल करत दोन अट्टल चोरट्यांना जेरबंद केले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी गुन्हे शोध पथकाला घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दि. २५ जून रोजी रात्री १० ते २६ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान शिवाजीनगरातील भगतसिंग चौक परिसरातील सुशील भाईलाल भावसार (वय ६१) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. या चोरीमध्ये एक डेल कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल फोन, पितळी कळशी आणि तीन हजार रुपये रोख असा एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता.
याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार राफत शेख फिरोज (वय २०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) आणि शेख शारीम शेख मुसेफ उर्फ मुसाब (वय २०, रा. सिंहगड, शिवाजीनगर हुडको, जळगाव) यांनी ही चोरी केली आहे.
पोलिसांनी तत्काळ दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर आरोपींकडून चोरीस गेलेला डेल कंपनीचा लॅपटॉप, सॅमसंग मोबाईल, नोकिया अँड्रॉईड मोबाईल, पितळी कळशी आणि रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार सुनील पाटील, दीपक शिरसाट, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भांडारकर, सतीश पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील तसेच पोलीस कर्मचारी अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार आणि भगवान मोरे यांनी केली.
अवघ्या पाच तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल जळगाव शहर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.





