Social

अमळनेरमध्ये नवरात्रोत्सवाचा जल्लोष! रॉकस्टार बँडसह खानदेशी कलाकारांची मांदियाळी

अमळनेरमध्ये नवरात्रोत्सवाचा जल्लोष! रॉकस्टार बँडसह खानदेशी कलाकारांची मांदियाळी

८० फूट रोडवर १० दिवस रंगणार भक्ती, संगीत आणि मनोरंजनाचा महोत्सव; विजेत्यांना सोन्याची नाणी व रोख बक्षिसे

अमळनेर I पंकज शेटे : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अमळनेरमध्ये यंदा भक्ती, संगीत आणि मनोरंजनाची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. ८० फूट रोडजवळील न्यू गौरी गणपती मित्र मंडळ आणि विक्की आबा मित्र परिवाराच्या वतीने भव्य नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात रॉकस्टार बँड, ढोल-ताशांचा गजर, खानदेशी गायक-कलाकारांचे कार्यक्रम, कीर्तन, महाप्रसाद आणि बक्षीस वितरण सोहळा असे विविध उपक्रम रंगणार आहेत.

आयोजक विक्रम किशोर जाधव (विक्की आबा) आणि मित्र परिवाराच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. देवीच्या मिरवणुकीने आणि ढोल-ताशांच्या गजरात शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महोत्सवाचा प्रारंभ होईल.

रॉकस्टार बँडपासून खानदेशी गीतांच्या कार्यक्रमांपर्यंत

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी यवतमाळचे प्रसिद्ध ढोल पथक, रॉकस्टार बँड, गायिका ऋतुजा पाटील, विधी खैरनार आणि भैया मोरे यांच्या सादरीकरणाची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी खानदेशचे गायक सचिन कुमावत आणि रुचिता जामदार यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी लोकप्रिय कलाकार पूजा ठाकूर यांचे खानदेशी गीतांवर आधारित सादरीकरण होणार आहे.

गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता रविकिरण महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी खानदेशी गायक भैया मोरे यांचा विशेष संगीतमय कार्यक्रम, तर शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी खानदेशी अभिनेता व गायक प्रशांत देसले यांचे सादरीकरण होणार आहे.

अष्टमीला होम, महाप्रसादाने भाविकांची तृप्ती

रविवार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता अष्टमीचा होम होईल. त्यानंतर रात्री दीपक कोळी (गलंगी) आणि संध्या मोरे यांच्या गीतांचा कार्यक्रम रंगणार आहे.

सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत भाविकांसाठी भव्य महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

विजेत्यांना सोन्याची नाणी, रोख बक्षिसे

महोत्सवाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १ ग्रॅम सोन्याचे नाणे, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला अर्धा ग्रॅम सोन्याचे नाणे, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला ५ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

अमळनेर शहरातील नागरिक, भाविक आणि रसिकांनी या नवरात्र महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन न्यू गौरी गणपती मित्र मंडळ आणि विक्की आबा मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : न्यू गौरी गणपती मित्र मंडळ, विक्की आबा मित्र परिवार, ८० फूट रोडजवळ, अमळनेर, जि. जळगाव.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button