Crime

जळगावात ६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; पोलिसांची मोठी कारवाई!

जळगावात ६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; पोलिसांची मोठी कारवाई!

दोन गुन्ह्यांतील एम्फेटामाइन आणि मेथाक्वालोन नियमानुसार नष्ट; मध्यरात्रीपासून प्रक्रिया, संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण

जळगाव, प्रतिनिधी : अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत दोन स्वतंत्र गुन्ह्यांत जप्त केलेले तब्बल ६५ कोटी ७० लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले. एम्फेटामाइन आणि मेथाक्वालोन या अंमली पदार्थांचा त्यात समावेश होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि निर्धारित नियमांचे पालन करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे आणि संबंधित विभागांच्या आदेशांनुसार जप्त अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.

९ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवलेले अंमली पदार्थ सीलबंद अवस्थेत बाहेर काढण्यात आले. यावेळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम उत्तम बाविस्कर उपस्थित होते. त्यानंतर हे पदार्थ पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’ या संस्थेकडे नष्ट करण्यासाठी पाठविण्यात आले.

दोन्ही गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत ६५ कोटी ७० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ जप्ती व विल्हेवाट समितीची मंजुरी घेतल्यानंतरच हे पदार्थ नष्ट करण्यात आले. संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करून कारवाईची नोंद ठेवण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे योगदान

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील व राहुल बैसाणे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील आणि उमाकांत पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.

सशस्त्र पोलीस गार्डचे पोलीस नायक शैलेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र बच्छे, आशुतोष सोनवणे आणि केतन सूर्यवंशी यांनीही बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली. शासकीय छायाचित्रकार पोलीस हेड कॉन्स्टेबल जयंत चौधरी यांनी संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण केले. पंच म्हणून सुनील बाबुराव विसावे आणि संजय गोविंद रंधे उपस्थित होते.

जप्त अंमली पदार्थांची नियमानुसार विल्हेवाट लावून पोलिसांनी अवैध अंमली पदार्थांच्या व्यवहाराला आळा घालण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button