मुक्ताईनगरात ५.३६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
पानमसाला, सुगंधित तंबाखूसह ६.११ लाखांचा मुद्देमाल ताब्यात; दोघांविरुद्ध गुन्हा

मुक्ताईनगरात ५.३६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
पानमसाला, सुगंधित तंबाखूसह ६.११ लाखांचा मुद्देमाल ताब्यात; दोघांविरुद्ध गुन्हा
मुक्ताईनगर : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ लाख ३६ हजार ३२४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला तसेच ७५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण ६ लाख ११ हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
भोईवाड्यात साठवणुकीचा प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता मुक्ताईनगर शहरातील भोईवाडा परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थांची साठवणूक करण्यात आल्याची बाब समोर आली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला पानमसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा व तत्सम अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी अंकित संजय सापधरे (रा. भोईवाडा, मुक्ताईनगर) आणि पवन दौलतानी शेठ (रा. बुरहानपूर, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्नसुरक्षा कायद्यान्वये कारवाई
या प्रकरणी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, जळगाव येथील योगराज किशोर सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेतील कलमांसह अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.५७ वाजता दाखल करण्यात आला.
प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री तसेच साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.







