नांदेडमधील लग्नाची राज्यभर चर्चा; तब्बल ३४६५ ग्रामस्थांना ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून दिले १ लाखांचे अपघात विमा कवच

नांदेडमधील लग्नाची राज्यभर चर्चा; तब्बल ३४६५ ग्रामस्थांना ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून दिले १ लाखांचे अपघात विमा कवच
नांदेड | प्रतिनिधी लग्न म्हटलं की दागिने, भेटवस्तू, थाटामाट आणि मोठ्या मेजवान्यांची चर्चा रंगते. मात्र नांदेड जिल्ह्यातील एका विवाह सोहळ्याने सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श निर्माण करत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावात पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात वरपक्षाने गावातील तब्बल ३ हजार ४६५ नागरिकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे अपघात विमा कवच भेट देत आगळावेगळे “रिटर्न गिफ्ट” दिले.
या उपक्रमामुळे गावात आनंद आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावरही या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. सिद्धेश्वर पेठकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या विवाह सोहळ्याला सामाजिक सेवेची जोड देत हा वेगळा निर्णय घेतला.
लग्नातून समाजसेवेचा संदेश
२० मे रोजी पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात पारंपरिक विधी, बँड-बाजा, वऱ्हाडी जेवण आणि भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते वरपक्षाच्या सामाजिक उपक्रमाने. पेठकर कुटुंबाने गावातील प्रत्येक पात्र नागरिकासाठी एक लाख रुपयांचा समूह अपघात विमा काढण्याचा निर्णय घेतला.
या उपक्रमांतर्गत एकूण ३३.६ कोटी रुपयांचे समूह अपघात विमा संरक्षण बहादरपुरा गावातील नागरिकांना मिळाले आहे. शेतीकाम करताना होणारे अपघात, साप चावण्याच्या घटना, वीज पडणे किंवा इतर दुर्घटनांमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळते. ही बाब लक्षात घेऊन समाजासाठी उपयुक्त ठरेल असा निर्णय घेतल्याचे पेठकर कुटुंबीयांनी सांगितले.
ग्रामपंचायतीमार्फत विमा योजना
विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता संपूर्ण गावासाठी ही विमा योजना लागू करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समूह अपघात विमा पॉलिसी घेण्यात आली असून गावातील मतदार यादी विमा कंपनीकडे सादर करून सर्व पात्र ग्रामस्थांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना स्वतंत्र कागदपत्रे किंवा अतिरिक्त प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज भासणार नाही.
ही विमा पॉलिसी एक वर्षासाठी वैध राहणार असून दुर्घटना घडल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार आहे. ग्रामीण भागात सामाजिक सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
“दानाची रक्कम जाहीर करू नये”
दरम्यान, या संपूर्ण विमा योजनेसाठी नेमका किती खर्च आला, याबाबत पेठकर कुटुंबाने माहिती देण्यास नकार दिला. “दान आणि पुण्याची रक्कम सार्वजनिकपणे सांगू नये,” अशी भूमिका कुटुंबाने घेतली आहे. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी अधिक आदर व्यक्त केला जात आहे.
सध्या या विवाहाची चर्चा केवळ नांदेडपुरती मर्यादित नसून राज्यभर होत आहे. लग्न समारंभांवर होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चाऐवजी समाजोपयोगी कार्यासाठी निधी वापरण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून बहादरपुरा गावातील नागरिकांनीही पेठकर कुटुंबाचे आभार व्यक्त केले आहेत. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत दिलेले हे अनोखे “रिटर्न गिफ्ट” आता महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.






