Social

अजनी धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार !

अजनी धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना ; ११ गावांना मोठा दिलासा

जळगाव  वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार उद्या दि. १५ मे २०२६ रोजी अजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात येणार आहे. निवासी जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्या आदेशानुसार गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी अजनी धरणातून सुमारे १५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अंजनी नदीपात्रात सोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या निर्णयामुळे धरणगाव तालुक्यातील तब्बल ११ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उन्हाळ्याच्या कडाक्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या ग्रामस्थांसाठी हे आवर्तन जीवनदायी ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

धरणगाव तालुक्यातील कल्याण (खु.), वाघळूद, चावलखेडा, पिंपळेसीम, भोद बु., हणमंतखेडे खु., पिंप्री खु., कल्याणेहोळ, भोद खु., हिंगोणे खु. आणि सतखेडा या ११ गावांना या आवर्तनाचा लाभ मिळणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार हे आवर्तन पिंप्रीमार्गे सोनवदपर्यंत सोडण्यात येणार आहे.
हे पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित असल्याने नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांनी शेतीसाठीचे मोटारपंप बंद ठेवावेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. तसेच नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.

*पालकमंत्र्याचे जनतेला आवाहन*
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना भावनिक आणि नम्र शब्दांत आवाहन करताना सांगितले की, “सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून ग्रामीण भागात पाण्याची परिस्थिती गंभीर बनत आहे. प्रशासनाने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून हे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी सर्वांच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पिण्याचे पाणी जपून, काटकसरीने आणि जबाबदारीने वापरावे. पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.

पालकमंत्री यांच्या तातडीच्या सूचनांमुळे प्रशासनाने जलद हालचाली करत हा निर्णय घेतल्याने पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झालेल्या ग्रामीण भागाला मोठा आधार मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button