PoliticsSocial

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर; ११२ जणांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर; ११२ जणांचे उत्स्फूर्त रक्तदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम; विविध केंद्रांवर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव | प्रतिनिधी

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी जळगाव शहरात विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाला नागरिकांसह वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात एकूण ११२ रक्तदात्यांनी स्वैच्छिक रक्तदान केले.

रक्तदान शिबिरांतर्गत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे सर्वाधिक ८८ जणांनी रक्तदान केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात १४, बी. व्ही. जैन रुग्णालयात ६ आणि चेतनदास रुग्णालयात ४ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या उपक्रमात क्षयरोग व उरुरोगशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ पुजारी यांनी स्वतः रक्तदान करून उपस्थितांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.

यावेळी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. दिपक शेजवळ, सहयोगी प्राध्यापक डॉ. स्मिता बोरा, रक्तकेंद्र प्रमुख डॉ. निलेश पाटील तसेच निवासी डॉक्टर डॉ. शिरीन पाटील, डॉ. श्रद्धा गायगोळ, डॉ. श्वेता वळवी, डॉ. चेतन लवंडे आणि डॉ. फैज सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच रक्तकेंद्रातील तंत्रज्ञ लक्ष्मीकांत त्रिपाठी, अश्विनी यादव, दीपक होनमाने, प्रदीप पाडवी, शादाब खान, मनोज पाटील, अरबाज खाटिक, ममता सोनावणे आणि रेहान शेख यांनीही शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमातून स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले. या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, रक्तदानाबाबत जनजागृतीसाठी असे उपक्रम अधिक प्रमाणात राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button