रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना ८ तास नियमित वीजपुरवठा द्या -आ.अमोल जावळे

रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना ८ तास नियमित वीजपुरवठा द्या -आ.अमोल जावळे
प्रतिनिधी l रावेर रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी पूर्वीप्रमाणे किमान ८ तास नियमित व अखंडित वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रावेर मतदारसंघामध्ये केळी हे मुख्य पीक असून सध्या केळी पीक कापणीच्या टप्प्यावर आहे. तसेच मोठ्या प्रमाणात उन्हाळी लागवड देखील करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सुरळीत व पुरेसा विजपुरवठा होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार जावळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सध्या कृषी पंपांसाठी मिळणारा वीजपुरवठा पूर्वीच्या ८ तासांवरून कमी करून ६ तास करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. वाढत्या तापमानामुळे केळी पिकाच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन कृषी पंपांसाठी तात्काळ पूर्वीप्रमाणे ८ तासांचा नियमित व अखंडित विजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली आहे.






