PoliticsSocial

विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

मंजूर कामे तातडीने मार्गी लावा; महत्त्वाच्या प्रकल्पांचे प्रस्ताव १५ दिवसांत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश

पाळधी रेल्वे पूल, धरणगाव बायपास व रिंग रोडला प्राधान्य

जळगाव, दि. ७ – जिल्ह्यासह जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मंजूर विकासकामांना गती देण्यासह आगामी काळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नगरपालिका तसेच शेतपाणंद रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. मंजूर झालेली कामे तातडीने सुरू करून प्रगतीतील कामे पूर्णत्वाकडे न्यावीत, तर अद्याप सुरू न झालेली कामे तात्काळ मार्गी लावावीत, येत्या १५ दिवसांपासून महिनाभराच्या कालावधीत प्रत्येक कामात ठोस प्रगती दिसली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी विशेष प्रकल्प, रस्ते व पूल, २५१५, नाविन्यपूर्ण योजना, आपत्ती व्यवस्थापन, आमदार निधी, गौण खनिज, सामाजिक न्याय, नाबार्ड, विशेष दुरुस्ती, वैशिष्ट्यपूर्ण योजना, ठक्कर बाप्पा, पर्यटन आदी विविध योजनांतील कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. अनेक कामांबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून थेट माहिती घेतली व अडचणींची कारणे विचारली. “निधी मंजूर आहे, तर कामाला विलंब नको. नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ वेळेत मिळाला पाहिजे. काम दर्जेदार आणि निर्धारित मुदतीतच झाले पाहिजे,” अशा सूचना त्यांनी दिल्या.

*धरणगाव बायपाससह प्रमुख पुलांच्या कामांना गती देण्याचे निर्देश*
धरणगाव शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या जांभोरे–रेल्वे गेट–गणेश नगर–बी. आर. कॉलेज या सुमारे १५ किमी बायपासचा डीपीआर तातडीने तयार करून त्यासाठी निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. बांभोरी–निमखेडी पुलाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून दोन्ही बाजूंच्या ॲप्रोच रस्त्यांचे प्रस्तावही तातडीने शासनाकडे सादर करावेत त्याचप्रमाणे म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या सुधारित प्रकल्पाला गती देऊन शेतकऱ्यांना सुलभ व सुरक्षित वाहतुकीसाठी स्वतंत्र बोगद्याचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

पाळधी रेल्वे पुलासाठी आवश्यक निधी व मंजुरीचा परिपूर्ण प्रस्ताव तसेच पाळधी–दोनगाव–फुपनगरी- ममुराबाद–आसोदा–तरसोद– नशिराबाद–NH-6 रिंग रोडच्या प्रस्तावातील आवश्यक बाबींची पूर्तता करून शासन मंजुरीसाठी पुढील कार्यवाहीला गती द्यावी असे त्यांनी सांगितले.

*पंचायत समितीच्या सात कोटींच्या इमारत प्रस्तावाचे सादरीकरण*
जळगाव पंचायत समितीच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे वास्तुविशारद पारगावकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यांनी यावेळी सविस्तर आढावा सादर केला. पालकमंत्री पाटील यांनी आवश्यक सुधारणा सुचवून सुमारे सात कोटी रुपयांचा प्रस्ताव तातडीने जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याचे निर्देश दिले.

जिल्हा परिषदेची जुनी इमारत नव्याने बांधणे व दोन्ही इमारतींना जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी वास्तुविशारद नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून DPR तयार करावा, तसेच निधी मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देशही त्यांनी दिले. जळगाव तालुक्यातील २५ तलाठी व ७ मंडळ कार्यालयांच्या इमारतींचे प्रस्तावही अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

*गुणवत्तापूर्ण विकास कामे करावीत*

“विकासकामांसाठी निधी आणणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच मंजूर निधीतून काम वेळेत आणि दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होणे महत्त्वाचे आहे. मंजूर कामांना तातडीने गती द्या. शाखा अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट देऊन कामांची वेळोवेळी पाहणी करुन जी कामे सुरू झालेली नाहीत ती मार्गी लावा आणि प्रगतीतील कामे पूर्णत्वाकडे न्या. नागरिकांना कामांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात दिरंगाई होता कामा नये,” अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत शासन स्तरावर मंजुरीसाठी आवश्यक प्रस्ताव, अंदाजपत्रके, तांत्रिक मान्यता व डीपीआर निर्धारित मुदतीत सादर करून सातत्याने पाठपुरावा करण्याचे तसेच बैठकीत दिलेल्या निर्देशांच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले.

बैठकीस उपविभागीय अधिकारी, योगेश कुमार मीना, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, कार्यकारी अभियंता सुहास सुपे, रोहयो अधिकारी मंजुषा घाटगे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व सागर कोल्हे, नगरविकास शाखेचे सह आयुक्त जनार्दन पवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे विजय शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे, डॉ. संजय चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील व श्री. शिंदे, उपअभियंता शिंदे, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नशिराबादचे मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे, धरणगावचे मुख्याधिकारी रोषण राजपुत, जि. प. बांधकाम विभागाचे अभियंता सतीश शिसोदे, नायब तहसीलदार राहुल वाघ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,पवन सोनवणे यांच्यासह सर्व उपअभियंते, शाखा अभियंते व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीतील विविध विषयांचे सादरीकरण उपअभियंता सतीश शिसोदे यांनी केले. सुरुवातीला उपविभागीय अधिकारी योगेश कुमार मीना यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी. पाटील यांनी आभार व्यक्त केले.
*************

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button