राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ ची तयारी अंतिम टप्प्यात

राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ ची तयारी अंतिम टप्प्यात
जळगाव प्रतिनिधी वंदे मातरम् या गीताला १५० वर्ष पूर्ण होत असल्याने वंदे मातरम@१५० या थीमवर आयोजित कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दि. ५ ते ९ नोव्हेंबर या दरम्यान होणाऱ्या एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ ची तयारी अंतिम टप्प्यात असून पाच रंगमंचांवर विद्यार्थ्यांचा कलाविष्कार अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे, व्य.प. सदस्य नितीन झाल्टे व कुलसचिव डॉ.विनोद पाटील, अधिसभा सदस्य स्वप्नाली काळे, दिपक पाटील हे देखील उपस्थित होते. विद्यापीठ परिसरात या महोत्सवाची जय्यत तयारी विद्यापीठातर्फे करण्यात आली असून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत विविध फलक, सजावट, रस्त्याच्या दुतर्फा सजावट करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठ परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील २६ विद्यापीठातील १४०० सहभागींची विद्यापीठाच्या वेगवेगळ्या वसतिगृहांमध्ये निवासाची व्यवस्था आणि भोजनाची व्यवस्था शिक्षक भवन परिसरात करण्यात आली आहे.
सहभागी संघाचे आगमन दि.४ नोव्हेंबर पासून सहभागी होणार असून दि. ५ रोजी सकाळी ९.०० वाजता विद्यार्थी स्पर्धेचे उद्घाटन होण्यापूर्वी सहभागी संघाची शोभायात्रा असणार आहे.विविध कलाप्रकार सादरीकरण करण्यासाठी पाच रंगमंचाची व्यवस्था करण्यात आली आहे. रंगमंच क्र. १ ला बंकीमचंद्र चटोपाध्याय रंगमंच (दीक्षांत सभागृह), रंगमंच क्रमांक २ला स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, रंगमंच क्रमांक ३ ला नेताजी सुभाष चंद्र बोस, रंगमंच क्रमांक ४ ला क्रांतिवीर खाजा नाईक सभागृह, रंगमंच क्रमांक ५ ला शिरीष कुमार मेहता सभागृह अशी स्वातंत्र्यसेनानींची नावे देण्यात आली आहेत. अशी माहिती महोत्सवाचे आयोजन सचिव तथा संचालक विद्यार्थी विकास विभाग डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी दिली.






