ब्रेकिंग : पीएसआयला लाच भोवली, पंटरसह दोघे एसीबीच्या जाळ्यात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करता केवळ चॅप्टर केस करून सोडून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राजू सांगळे आणि खासगी व्यक्ती सलीम हकीम कुरेशी (रा.बोदवड) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या मित्राने एका व्यक्तीस दिलेले पैसे परत मागितल्याच्या वादातून २८ मार्च २०२६ रोजी भुसावळ येथील खडक चौफुली परिसरात मारामारी झाली होती. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या मित्राविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक न करता केवळ चॅप्टर केस करून सोडून देण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक राजू सांगळे यांच्या वतीने सलीम कुरेशी यांनी फिर्यादीकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार ७ एप्रिल २०२६ रोजी एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फिर्यादीने पोलिस उपनिरीक्षक राजू सांगळे यांची भेट घेतली असता त्यांनी तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याची मागणी करून ती स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे एसीबीच्या तपासात आढळून आले. यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली. लाचेची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर राजू सांगळे आणि सलीम हकीम कुरेशी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व ७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास पथकात यांचा होता समावेश
कारवाईचे पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर होते. सापळा अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी काम पाहिले. कारवाईत पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अमोल सूर्यवंशी, भूषण पाटील, राकेश दुसाने आणि प्रणेश ठाकूर यांनी सहभाग घेतला. संपूर्ण कारवाई एसीबी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक भारत टांगडे, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.






