राज्यात सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस दलात मोठे फेरबदल

मुंबई :l महापोलीस न्यूज l १४ मे २०२५ l राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने सात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, या बदल्यांमुळे पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाले आहेत.
या बदल्यांत रवींद्र शिसवे यांची राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. विशेष आस्थापना विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदी सुप्रिया पाटील-यादव यांची बदली झाली असून, सागरी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून राजीव जैन यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नागपूर शहराचे पोलीस सहआयुक्त म्हणून कार्यरत असलेले निसार तांबोळी यांची बदली राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) महानिरीक्षकपदी झाली आहे. त्यांच्या जागी एन. डी. रेड्डी नागपूरचे नवे सहआयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
अमली पदार्थ विरोधी विशेष कृती दलाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी शारदा निकम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच अभिषेक त्रिमुखे यांची बदली प्रशासन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे.
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात प्रशासकीय बदलांची मालिका सुरू असून, डिसेंबर महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला आहे. गेल्या आठवड्यातच सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.