शिवाजीनगरवासीयांनी शुक्र-गुरूचा महायुतीचा आनंद घेतला
कॉस्मिक किस'; खगोलप्रेमींसाठी ठरली विलोभनीय पर्वणी!

शिवाजीनगरवासीयांनी शुक्र-गुरूचा महायुतीचा आनंद घेतला
कॉस्मिक किस’; खगोलप्रेमींसाठी ठरली विलोभनीय पर्वणी!
जळगाव: मंगळवार, ९ जून २०२६ ची संध्याकाळ. ७.३० वाजता ‘निसर्गमित्र, जळगाव’तर्फे शिवाजीनगर येथील नागरिकांसाठी शुक्र-गुरूच्या महायुतीचा एक अविस्मरणीय खगोलीय अनुभव दर्शन कार्यक्रम घेण्यात आला. सूर्यमालेतील दोन सर्वात तेजस्वी ग्रह, शुक्र (Venus) आणि गुरू (Jupiter), एकमेकांच्या अत्यंत जवळ आल्याचे अद्भुत दृश्य पश्चिम क्षितीजावर पाहायला मिळाले. जागतिक स्तरावर ‘नॅशनल जिओग्राफिक’ने ज्याला ‘कॉस्मिक किस’ असे संबोधले होते, त्या शुक्र आणि गुरूच्या महायुतीविषयी उपस्थितांना शास्त्रीय माहिती पक्षीमित्र राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांनी दिली. हे विहंगम दृश्य बघण्यासाठी सुरेश महांगडे, प्रदीप शिंदे, डॉक्टर पीयूष पाटील, महेश पवार, शैलजा शिंदे, किशोर गुजराथी, स्वामी साळुंके यांनी सहभाग घेतला.
संध्याकाळी अंधार झाल्यावर ७:०० वाजल्यापासूनच पश्चिम आकाशात या हालचाली स्पष्ट दिसू लागल्या होत्या. ७:४५ ते ८:१५ ही वेळ निरीक्षणासाठी सर्वोत्तम ठरली, कारण यावेळी आकाशात अंधार पसरल्यामुळे शुक्राची प्रखर चकाकी आणि गुरूचा पिवळसर रंग अधिक स्पष्टपणे उठून दिसत होता.
पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी ही युती म्हणजे प्रत्यक्षात ग्रहांचे एकमेकांजवळ येणे नसून केवळ एक ‘दृष्टीभ्रम’ (Optical Illusion) असल्याचे उपस्थितांना सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ यांनी सांगितले की, ही युती जरी दिसत असली तरी प्रत्यक्षात युतीदरम्यान शुक्र पृथ्वीपासून सुमारे १८ कोटी किलोमीटर, तर गुरू ९० कोटी किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वीवरून पाहताना ते एकाच दृष्टीरेषेत (Line of Sight) आल्यामुळे ते शेजारी असल्याचे भासत होते.
पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले की, “ही घटना म्हणजे केवळ केपलरच्या ग्रहांच्या गतीविषयक नियमांचे आणि भौमितिक मांडणीचे एक सुंदर नैसर्गिक गणित आहे. याचा मानवी जीवनावर कोणताही ज्योतिषीय प्रभाव नसतो.” जमलेल्या खगोलप्रेमी नागरिकांनी आमच्या जवळ असलेल्या लहान दुर्बिणींचा वापर करून या घटनेचा आनंद घेता आला. दुर्बिणीतून पाहताना गुरू ग्रहाच्या शेजारी त्याचे चार मोठे चंद्र—आयो, युरोपा, गॅनिमिड आणि कॅलिस्टो—लहान ठिपक्यांप्रमाणे स्पष्टपणे दिसत होते, तर दुसऱ्या बाजूला कोणताही उपग्रह नसलेला शुक्र आपल्या प्रखर तेजाने चमकत होता. जळगावमधील निरभ्र हवामानामुळे या खगोलीय घटनेत कोणताही अडथळा आला नाही, ज्यामुळे नागरिकांना विज्ञानाचा हा आविष्कार जवळून अनुभवता आला.





