Other

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यावर यशस्वी उपचार

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यावर यशस्वी उपचार

महादेव हॉस्पिटलमध्ये ‘फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी विथ लेझर पल्व्हरायझेशन’ शस्त्रक्रियेचे यश

जळगाव | प्रतिनिधी

जळगावातील महादेव हॉस्पिटलने मूत्रविज्ञान (युरोलॉजी) क्षेत्रात आणखी एक उल्लेखनीय कामगिरी करत अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चीर न देता मूत्रपिंडातील खड्यावर यशस्वी उपचार केले आहेत. हॉस्पिटलमध्ये प्रथमच ‘फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी विथ लेझर पल्व्हरायझेशन’ ही आधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

चोपडा येथील ५० वर्षीय महिलेच्या उजव्या मूत्रपिंडात खडा असल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर महादेव हॉस्पिटलमध्ये ‘राईट आरआयआरएस (रेट्रोग्रेड इंट्रारेनल सर्जरी) विथ लेझर पल्व्हरायझेशन’ ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

आरआयआरएस ही मूत्रपिंडातील खडे काढण्यासाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक आणि कमी त्रासदायक उपचारपद्धती मानली जाते. या प्रक्रियेत कोणतीही चीर न देता लवचिक युरेटेरोस्कोपच्या सहाय्याने मूत्रमार्गातून मूत्रपिंडापर्यंत पोहोचून लेझरच्या मदतीने खड्याचे सूक्ष्म तुकडे करण्यात येतात. त्यामुळे रुग्णाला कमी वेदना होतात, रक्तस्रावाचा धोका कमी राहतो आणि रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.

महादेव हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून संबंधित रुग्णाला मोठा दिलासा दिला आहे. या शस्त्रक्रियेसाठी प्रा. व विभागप्रमुख डॉ. हेमंत केळकर, प्रा. डॉ. हर्षद चौहान, डॉ. शुभम चौधरी आणि डॉ. श्रीकांत रेड्डी यांच्या तज्ज्ञ चमूने काम केले. तसेच भूलतज्ज्ञ प्रा. डॉ. रघुनाथ बराटे आणि डॉ. ननिता चौधरी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

रुग्णाची प्रकृती समाधानकारक असून त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.

आधुनिक उपचारपद्धतीचा नवा टप्पा

अत्याधुनिक फ्लेक्सिबल युरेटेरोस्कोपी आणि लेझर तंत्रज्ञानामुळे आता मूत्रपिंड व मूत्रमार्गातील खड्यांवर सुरक्षित, प्रभावी आणि जलद उपचार उपलब्ध झाले आहेत. या पद्धतीत खड्यांचे सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर करून त्यांचे प्रभावी निर्मूलन केले जाते. त्यामुळे ही उपचारपद्धती कमी वेदनादायी, अधिक सुरक्षित आणि जलद पुनर्वसन करणारी मानली जाते.

«”महादेव हॉस्पिटलमध्ये प्रथमच यशस्वीपणे पार पडलेली ही शस्त्रक्रिया जळगाव जिल्ह्यातील रुग्णांसाठी अत्याधुनिक युरोलॉजी उपचारांची नवी दिशा ठरणार आहे.”
— डॉ. हेमंत केळकर

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button