तलवारीने केक कापून दहशत माजविणाऱ्या तरुणाला अटक

तलवारीने केक कापून दहशत माजविणाऱ्या तरुणाला अटक
यवतमाळ पोलिसांची कारवाई; वाढदिवसाचा उत्साह पोलिस ठाण्यात
यवतमाळ – वाढदिवसाच्या उत्सवात तलवारीने केक कापून गावात दहशत माजविणाऱ्या एका तरुणाला यवतमाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून धारदार तलवार, मोबाइल आणि बुलेट मोटरसायकल असा एकूण 1.61 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने गुरुवारी (दि. 13 मार्च 2025) आणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल उर्फ अजय प्रकाश बनसोड (रा. इवळेश्वर, ता. आणी, जि. यवतमाळ) याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सार्वजनिक रस्त्यावर रॉयल इनफिल्ड बुलेटवर केक ठेऊन तलवारीने तो कापत दहशत निर्माण केली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून केक कापण्यासाठी वापरलेली धारदार तलवार, फोटो काढण्यासाठी वापरलेला मोबाइल आणि बुलेट मोटारसायकल असा 1,61,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी आणी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप आणि पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय महाले, पोलीस अंमलदार पोहेकॉ. बोरकुटे, पोहेकॉ. मोती पवार, विकास सोनवणे, सोहेल मिर्झा, अमित झेंडेकर, जितेंद्र चौधरी, अमित कुमरे आदींनी यशस्वीरित्या पार पाडली.