मोठी बातमी : भारताची ऐतिहासिक झेप : जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला!
जपानला मागे टाकत ४ ट्रिलियन डॉलर्स क्लबमध्ये प्रवेश, नीती आयोगाचा अहवाल

मोठी बातमी : भारताची ऐतिहासिक झेप : जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला!
जपानला मागे टाकत ४ ट्रिलियन डॉलर्स क्लबमध्ये प्रवेश, नीती आयोगाचा अहवाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतासाठी ही ऐतिहासिक आणि अभिमानास्पद बातमी आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून त्याने जपानला मागे टाकले आहे. नीती आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीनंतर आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा (IMF) आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था आता तब्बल ४ ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
बीव्हीआर सुब्रह्मण्यम म्हणाले, “मी जे बोलतोय, ते माझ्या आकडेवारीवर नाही तर IMF च्या अधिकृत आकडेवारीवर आधारित आहे. भारत आता जपानपेक्षाही मोठा आहे आणि जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे.”
पुढील टप्पा – तिसऱ्या क्रमांकासाठी शर्यत
भारताच्या पुढे आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या तीन देश आहेत. सुब्रह्मण्यम पुढे म्हणाले, “जर आपण योग्य धोरणांवर टिकून राहिलो, तर येत्या २.५ ते ३ वर्षांत आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो. ही पंतप्रधानांची दूरदृष्टी आहे आणि सर्व राज्यांनी आपापल्या स्तरावर ‘व्हिजन डॉक्युमेंट्स’ तयार करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.”
भारत बनतोय उत्पादनासाठी हब
Apple iPhone चे उत्पादन भारतात हलवण्याच्या चर्चेवर बोलताना सुब्रह्मण्यम म्हणाले, “भारत ही उत्पादनासाठी एक स्वस्त व गतिशील जागा ठरू शकते. भविष्यात अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करतील, असा विश्वास वाटतो.”