मनपाची मालमत्ता कर वसुली वाढविण्यासाठी उपमहापौरांची मागणी

मनपाची मालमत्ता कर वसुली वाढविण्यासाठी उपमहापौरांची मागणी
थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम, नवीन एजन्सी नियुक्ती आणि मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाईची सूचना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ मधील मालमत्ता कर वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असून कोट्यवधी रुपयांची थकबाकी शिल्लक असल्याने महसुलावर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत करवसुली प्रभावी करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
उपमहापौर चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अनेक मालमत्ता कर प्रकरणे वादग्रस्त असल्याने वसुली रखडली असून मनपाच्या आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सर्व प्रभागांमध्ये विशेष करवसुली मोहीम राबवून थकीत कर वसुलीला गती देण्याची आवश्यकता आहे.
निवेदनात विद्यमान मनुष्यबळ अपुरे असल्यास नवीन एजन्सी किंवा कंत्राटी पद्धतीने प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच लक्ष्याधारित वसुली प्रणाली लागू करून अपेक्षित वसुली न करणाऱ्या एजन्सींवर दंडात्मक कारवाई आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहनपर मोबदला देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
मोठ्या थकबाकीदारांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर जप्ती, मालमत्ता सील करणे, नळजोडणी खंडित करणे, परवाने नूतनीकरण न करणे अशा कायदेशीर उपाययोजना करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय वादग्रस्त करप्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.
प्रत्येक प्रभागातील साप्ताहिक व मासिक करवसुलीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, मोठ्या व्यावसायिक आस्थापना, मॉल, उद्योग आणि उच्च थकबाकीदारांसाठी विशेष वसुली पथक नियुक्त करावे तसेच ऑनलाइन आणि डिजिटल माध्यमातून कर भरण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे.







