Politics

धनंजय मुंडेंचा राजीनामा; अनिल पाटील, छगन भुजबळांना संधी?

धनंजय मुंडेंचा राजीनामा; अनिल पाटील, छगन भुजबळांना संधी?

जळगाव, प्रतिनिधी – अजित पवार गटाचे वादग्रस्त नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सकाळी राजीनामा दिला. त्यानंतर, अजित पवार गटातील दुसरे वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटेही अडचणीत आले असून, त्यांच्याही राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर, धनंजय मुंडे यांच्या रिक्त मंत्रिपदासाठी अमळनेरचे आमदार अनिल पाटील आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर राजीनामा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे समोर आले आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि राजीनाम्याचा दबाव

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचे उघड झाले.विरोधक आणि भाजपच्या काही आमदारांनी या प्रकरणावरून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या विषयावर आवाज उठवल्याने, अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला.

अनिल पाटील यांना संधी?

महायुती सरकारमध्ये अनिल पाटील यांच्याकडे पूर्वी मदत व पुनर्वसन मंत्रीपद होते. मात्र, दुसऱ्या कार्यकाळात त्यांचे नाव वगळण्यात आले होते. आता धनंजय मुंडेंच्या जागी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळ पुन्हा मंत्रीपदावर?
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. आता, नव्या राजकीय समीकरणांमध्ये भुजबळ यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सरकार कोणाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अनिल पाटील की छगन भुजबळ? की अजून कोणता आश्चर्याचा धक्का?महायुतीतील नव्या राजकीय हालचाली महत्त्वाच्या ठरणार आहे.या संपूर्ण प्रकरणावर पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button