मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक ५ जूनला; विराज कावडीया यांना आमंत्रण

मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक ५ जूनला; विराज कावडीया यांना आमंत्रण
मुंबईतील मध्य रेल्वे मुख्यालयात बैठकीचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समितीची बैठक येत्या ५ जून २०२५ रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या मध्य रेल्वेच्या मुख्यालयात होणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.
या बैठकीसाठी जळगावचे प्रतिनिधी आणि सल्लागार समिती सदस्य विराज अशोक कावडीया यांना अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे. या बैठकीत मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे आणि सोलापूर अशा विभागांतील सुमारे ५०० रेल्वे स्थानकांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार आहे. रेल्वे सेवा, प्रवासी सुविधा, स्थानकांची स्थिती आणि इतर महत्त्वाच्या बाबींचाही आढावा घेण्यात येणार आहे.
या बैठकीस मध्य रेल्वेच्या सर्व विभागांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सल्लागार समितीचे एकूण ५८ सदस्य उपस्थित राहणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी रेल्वे संदर्भातील अडचणी, सूचना किंवा मागण्या असल्यास त्या विराज कावडीया यांच्या ६३, गणेशवाडी, जिल्हापेठ, पांडे चौक, जळगाव येथे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे